साकूर झेडपीचा सदस्य बिरेवाडीचा होणार? गावातील राजकीय परिस्थिती कशी?….

संगमनेर (DSNews24/किरण पुरी) गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणूकांच्या तारखा अद्यापही जाहीर झाल्या नाहीत. मात्र काही दिवसांपूर्वी गट व गणाच्या सदस्यपदाचे आरक्षण निघाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी अक्षरशः पायाला भिंगरी लावून प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यातच संगमनेर तालुक्यातील साकूर जिल्हा परिषदेच्या गटाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

कारण गेल्या दोन दशकांपासून साकूर जिल्हा परिषद गटावर सलग चार वेळा कॉंग्रेसचा उमेदवार निवडून आला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत कॉंग्रेससमोर विरोधी उमेदवार टिकणार का? अशी चर्चा सध्या सुरू आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले यांनी जिल्हा परिषदेसाठी तयारी केली आहे. तेही महायुतीकडून उमेदवारी करणार असल्याची चर्चा आहे. तसेच कॉंग्रेसनेही सुप्रसिद्ध व्यापारी बाळासाहेब भाऊसाहेब सागर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असून त्यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. दोन्ही उमेदवार नवखे असल्याने या निवडणुकीत उमेदवार म्हणून युवकांचा चेहरा असण्याची शक्यता आहे.

तसेच कॉंग्रेसचे संभाव्य उमेदवार बाळासाहेब भाऊसाहेब सागर व महायुतीचे संभाव्य उमेदवार गुलाबराजे पांडुरंग भोसले हे दोघेही मुळचे साकूर जवळील बिरेवाडी येथील रहिवासी आहे. दोन्ही उमेदवार एकाच गावचे असल्याने बिरेवाडी गावाला सध्या महत्त्व वाढलं आहे. तसेच भविष्यात बिरेवाडी गाव हे सत्ताकेंद्र बनणार आहे. गेल्या अनेक दिवसांनंतर बिरेवाडी गावाला मोठी संधी मिळणार आहे. तसेच गुलाब भोसले हे भाजपचे तालुकाध्यक्षपदावर असून बाळासाहेब सागर युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यामुळे भविष्यात या दोघांची लढत झाली तर जो उमेदवार निवडून येईल तो जिल्हा परिषदेचा विजयी उमेदवार बिरेवाडीचा असणार आहे. दरम्यान या आधी काही वर्षांपूर्वी बिरेवाडीचे स्व. शिवाजीराव आनंदराव शेंडगे पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आले होते. त्यांना त्यावेळी कॉंग्रेसकडून संधी मिळाली होती.

गावात राजकीय परीस्थिती कशी? 

महायुतीचे गुलाबराजे भोसले व कॉंग्रेसचे बाळासाहेब सागर यांच्या गावात राजकीय परीस्थिती कशी आहे अशी देखील चर्चा सुरू आहे. बिरेवाडी ग्रामपंचायतीचा जर विचार केला तर सध्या ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर व थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर यांच्या मार्गदर्शनाखाली कॉंग्रेसची सत्ता आहे. ९ पैकी ६ जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार निवडून आले असून सरपंच देखील कॉंग्रेसचा आहे. तसेच विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी व गजानन सहकारी दूध उत्पादक संस्थेवर देखील कॉंग्रेसचा झेंडा आहे. म्हणजेच गावातील सर्व संस्था कॉंग्रेसच्या ताब्यात आहे.

गुलाबराजे भोसले यांची रणनिती कशी? 

जिल्हा परिषदेची निवडणूक काही करून लढवायचीच अशी ठोस भूमिका कुठलाही राजकीय वारसा नसलेले भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले यांनी घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांनी देखील संपूर्ण जिल्हा परिषद गट पिंजून काढला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते गटातील प्रत्येक गावात फिरताना दिसत आहे. प्रत्येक मतदारांपर्यंत ते पोहचत आहे. सोशल मीडियावर देखील त्यांचे कार्यकर्ते ॲक्टिव झाल्याचे दिसत आहे. मात्र गेल्या दोन दशकांपासून साकूर जिल्हा गटावर सलग चार वेळा कॉंग्रेसचा झेंडा फडकवला आहे. कॉंग्रेसची मजबूत ताकद असल्याने या विरोधात गुलाब भोसले रणनिती आखताना दिसत असल्याची चर्चा आहे.

बाळासाहेब सागर यांच्या रणनिती मागे कोण? 

मूळचे बिरेवाडी येथील रहिवासी असलेले बाळासाहेब भाऊसाहेब सागर यांना कुठलाही राजकीय वारसा नाही. ते मेडिकल व्यावसायात असलेले अग्रेसर व्यावसायिक म्हणून ओळखले जात आहे. त्यांचे वडिल भाऊसाहेब बापू सागर माजी मंत्री बाळासाहेब थोरात व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. कॉंग्रेसकडून बाळासाहेब सागर यांचं नाव उमेदवारीसाठी चर्चेत आल्यानंतर ते देखील प्रचारात चांगलेच सक्रिय झाले आहे. तसेच या निवडणुकीचे सर्व धूरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा अपराजित व्यक्तीमत्व शंकरराव खेमनर व थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. तसेच अचूक रणनिती ते आखताना दिसत आहे.

मात्र सध्याची परिस्थिती पाहता दोन्ही उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. तसेच प्रचाराचा देखील धूराळा उडणार आहे.

Leave a Comment