संगमनेर (DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथील ग्रामस्थांसाठी नवसंजीवनी ठरलेल्या शेंडगे वस्तीवरील पाझर तलावाची दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या कामाचा शुभारंभ विद्यमान सरपंच निलम ढेंबरे व उपसरपंच आण्णासाहेब कढणे यांच्या हस्ते करण्यात आला.
गेल्या काही वर्षांपूर्वी शेंडगे वस्ती येथे पाझर तलाव उभारण्यात आला आहे. पाझर तलावातील पाणी साठ्याची क्षमता मोठ्या प्रमाणात असून यामुळे शिवारातील विहिरी, बोअरवेलची पाणी पातळी वाढली जाते. तसेच शेतकऱ्यांनाही चांगला फायदा होतो. परंतु काही दिवसांपासून पाझर तलावाची दुरुस्ती रखडली होती.
तसेच पाझर तलावाची दुरुस्ती होणे गरजेचे असल्याने लघु पाटबंधारे विभागांतर्गत निधी मंजूर झाला. तसेच २४ एप्रिल रोजी झालेल्या ग्रामसभेत पाझर तलावाचे काम सर्वांनी एकत्र येऊन उत्कृष्ट पद्धतीने करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला. यास ग्रामस्थांनी चांगला प्रतिसादही दिला.
या कामाचा शुभारंभ नुकताच सरपंच निलम ढेंबरे व उपसरपंच आण्णासाहेब कढणे यांच्या हस्ते झाला असून पाझर तलावाचे खोदकाम, कागद टाकणे, पिचींग करणे व साईटने पाण्यासाठी सांडवा काढणे अशी कामं करण्यात येणार आहे. यामुळे भविष्यात पाझर तलावाचा शिवारातील शेतकरी व ग्रामस्थांसाठी मोठा फायदा ठरणार आहे.
शुभारंभ प्रसंगी विठ्ठल सागर, भास्कर ढेंबरे, राजेंद्र शेंडगे, लालू सागर, किसन ढेंबरे, भाऊसाहेब गळंगे, सुभाष सागर, पांडुरंग ढेंबरे, इश्वर सागर आदि ग्रामस्थ उपस्थित होते.
