संगमनेर(DSNews24/किरण पुरी) किती लोकप्रियता असावी, किती जनसंपर्क असावा, किती लोकांकरीता धावून जाण्याचा स्वभाव असावा याचं मुर्तीमंत उदाहरण म्हणजे लक्ष्मण ( नाना ) धुळगंड आहे. नानांना जाऊन ९ वर्ष झाले. नाना गेल्याने तेव्हा एक धक्का बसला होता. नानांच्या अंत्यविधीला हजारोंची असलेली गर्दी आजही डोळ्यासमोरून जात नाही. लक्ष्मण ( नाना ) समाजात वावरणार चैतन्य होत असे प्रतिपादन कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलंय.
संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील कै. लक्ष्मण (नाना) धुळगंड यांच्या ९ व्या पुण्यस्मरणानिमित्त धुळगंड परिवाराने केलेल्या भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदानाचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
या भव्य निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाचा शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सर्व क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील कुस्त्यांच्या जंगी मैदानाचा आनंद लुटला. तसेच तत्पूर्वी धुळगंड परिवाराने बाळासाहेब थोरात यांची कार्यक्रमस्थळी एंट्री होताच फटाक्यांची आतषबाजी केली. तसेच वाजतगाजत त्यांचं स्वागत केलं.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात पुढे बोलताना म्हणाले की, धुळगंड नाना हे खर्या अर्थाने एक विलक्षण व्यक्तिमत्व होते. साधेपणा, जिव्हाळा आणि माणुसकी ही त्यांची ओळख. गावागावातील युवा वर्गाला प्रेरणा देऊन त्यांनी तालुक्यातील कुस्तीची परंपरा मजबूत केली. अनेक पैलवान आणि नवोदित खेळाडू घडवण्याचे कार्य त्यांनी आयुष्यभर केले. नानांना कुस्त्यांची आवड होती. मुलांना कुस्तीगिर बनविण्यासाठी ते प्रयत्न करायचे. तसेच त्यांनी कुस्तीच शिक्षण देण्यासाठी एक वस्ताद देखील ठेवला होता. नानांची पुढची पिढी समर्थपणे त्यांचा वारसा चालविण्याच काम करत आहेत. रामदास धुळगंड सर हे थोरात कारखान्याचे संचालक आहे. त्यांचे कुटुंबीयांनी नानांची आठवण म्हणून निकाली कुस्त्यांच मैदान सुरू केलं. आज २०० पैलवान कुस्त्यांच्या आखाड्यात उतरले आहेत. धुळगंड कुटुंबीयांनी उत्कृष्ट नियोजन करत कुस्त्यांचे मैदान भरवले आहे. धुळगंड कुटुंब जनमाणसातल असून त्यांनी नानांची आठवण म्हणून ही परंपरा पुढे चालू ठेवली असल्याच बाळासाहेब थोरात म्हणाले.
या कुस्त्यांचे मैदानात अनेक नामांकित मल्लांनी सहभाग घेतला होता. तसेच मल्लांनी एक चपळाईचा खेळ दाखवत प्रेक्षकांचे मन जिंकले. धुळगंड परिवाराने कुस्ती मैदानाचे अत्यंत सुसज्ज नियोजन केले होते.
