संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर येथील सेवानिवृत्त शिक्षक सुरेश महादू सोनवणे यांनी एक अनोखा उपक्रम राबविला आहे. दैनंदिन बचतीतील १०, २० रूपयांच्या नाण्यांचे ठोकळ्यांतून जवळपास १० हजार रूपये जमा केले. विशेषतः ही सर्व रक्कम सुरेश सोनवणे यांनी कै. दशरथ नाथा सोनवणे यांच्या पुण्यस्मरणार्थ व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पा. खेमनर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विद्या प्रबोधिनी प्रशालेत जमा केलीय.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर, प्राचार्या गुलशन जमादार, प्रा. प्रविण मिसाळ उपस्थित होते.
विशेष म्हणजे सदर रक्कम विद्यालयात मुदत ठेव म्हणून गुंतवली जाणार आहे. तसेच त्या ठेवीवर मिळणाऱ्या व्याजाची संपूर्ण रक्कम दरवर्षी इयत्ता १२वी विज्ञान शाखेतील प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास बक्षीस स्वरूपात दिली जाणार आहे.
सुरेश सोनवणे यांनी आपल्या बचतीतून शिक्षणासाठी दान देण्याची ही कल्पना केवळ अभिमानास्पदच नव्हे, तर नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. खरतर आजकाल पैशाची नाही, तर मनाची श्रीमंती कशी असते हे एक प्रेरणादायी उदाहरण सेवानिवृत्त शिक्षक सुरेश महादू सोनवणे यांनी दाखवून दिलंय. या प्रेरणादायी उपक्रमाबद्दल सुरेश सोनवणे यांच कौतुक केले जात आहे.
