नाशिक : नाशिकच्या सप्तश्रृंगी गडाच्या दिशेला जाणाऱ्या घाटावर रविवारी संध्याकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. सप्तश्रृंगी गडावरुन दर्शन घेऊन परतत असताना एक इनोव्वा कार 600 फूट खोल दरीत कोसळली.
या भीषण अपघातात गाडीतील सर्व सहा भाविकांचा मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त गाडीचा MH 15 BN 0555 असा नंबर आहे. या गाडीतील सर्व भाविक हे पिंपळगाव बसवंतचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. कळवण महसूल विभागाकडून घटनेतील मृतकांबाबत प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.
सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी गेलेल्या भाविकांची गाडी क्रमांक MH 15 BN 0555 घाटात भवरी धबधब्याजवळ ओव्हरटेकच्या नादात कठडे तोडून 600 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात पटेल परिवारातील सहा जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. अपघातातील सर्वजण हे पिंपळगाव बसवंत येथील रहिवासी होते. या घटनेत किर्ती पटेल (वय 50), रशिला पटेल (वय 50), विठ्ठल पटेल (वय 65), लता पटेल (वय 60), पचन पटेल (वय 60), मनी बेन पटेल (वय 70) यांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सप्तशृंगी गड आणि वनी पोलीस ठाणे येथील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदत कार्य करण्यास सुरुवात केली. पण अपघातातील गाडी ही खोल दरीत कोसळल्याने आणि दिवस मावळत असल्याने बचाव कार्यात अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे नाशिकवरून रेस्क्यू टीमला पाचरण करण्यात आलेले आहे. या अपघाताच्या घटनेवर संपूर्ण नाशिकमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने दु:ख व्यक्त केलं जात आहे.
