लातूर : निलंगा तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. राज्यात सध्या थंडीचा कडाका वाढत असून निलंगा तालुक्यातील औराद परिसरात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. अशा परिस्थितीत व्यायामासाठी गेलेल्या एका ग्रामसेवकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना निलंगा तालुक्यात घडली आहे. यामुळे संपूर्ण गावात शोकाकूळ वातावरण निर्माण झाले आहे.
नेमकं काय घडलं?
निलंगा तालुक्यातील अंबुलगा बु येथील रहिवासी तसेच निलंगा पंचायत समितीचे ग्रामविकास अधिकारी विकास विश्वासराव कुलकर्णी (वय 45) हे बुधवारी आपल्या गावी मुक्कामी होते. नेहमीप्रमाणे सकाळच्या वेळी ते व्यायामासाठी घराबाहेर पडले. निलंगा-तोगरी रस्त्यावरून शेताकडे जात असताना रस्त्याच्या कडेला व्यायाम करत होते. त्यावेळीच त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे ते जमीनीवर कोसळले.
विकास यांना जमीनीवर पाहून परिसरातील शेताकडे आलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने मदतीस धाव घेतली. त्यांनी विकास कुलकर्णी यांना त्वरित निलंगा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी व्यायाम करत असतानाच त्यांना झटका आल्याची माहिती दिली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती कार्यालयात तसेच अंबुलगा बु गावात शोककळा पसरली. कर्तव्यदक्ष, मनमिळावू आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळख असलेले विकास कुलकर्णी हे आपल्या कामात अत्यंत तत्पर होते. ग्रामविकासाच्या अनेक कामांमध्ये त्यांनी सक्रिय भूमिका बजावली होती. त्यांच्या अकाळी मृत्यूने गावात दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे..
