बापरे! मुलीचे हातपाय चिकटपट्टीने बांधले अन् आईनेही….. पुण्यात खळबळ

पुणे – मुलीच्या आजाराला कंटाळलेल्या आईने पोटच्या लेकीची हत्या करून स्वतः देखील आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. सदर घटना पुण्यातील पुन्हगीळ वारजे भागात घडली आहे. मृत मुलीचे नाव शारवी आदिनाथ देवडकर (वय २) आणि तिच्या आईचे नाव छाया आदिनाथ देवडकर (वय २८) असे आहे. पोलीस या घटनेचा तपास करत असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छाया चे पती आदिनाथ देवडकर, पत्नी छाया आणि मुलगी शारवी असे गोकुळनगर पठार परिसरात वास्तव्यास होते. शारवीला अस्थिविकार असल्याचे निदान झाले होते. त्याबाबत उपचार सुरू होते. मुलीला झालेल्या या आजारामुळे छाया नैराश्यात होत्या. शुक्रवारी आदिनाथ कामानिमित्त बाहेर गेले होते. दुपारी दीडच्या सुमारास ते कामावरून घरी आले. त्यावेळी शारवी त्यांना घरातील पाळण्यात निपचित पडलेली दिसली. तिचे हात पाय चिकटपट्टीने बांधण्यात आलेले होते. तसेच पत्नी छायाने गळफास घेतल्याचे त्यांनी पाहिले. त्यामुळे घाबरलेल्या आदिनाथ याने पोलिसांकडे धाव घेतली.

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. दोघींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारांपूर्वीच दोघींचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान या घटनेचा अधिक तपास पोलीस करत असून आई आणि मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

Leave a Comment