कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली. या महानगर पालिकेमध्ये शिवसेना शिंदेगटाचा महापौर होणार आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली. कल्याण-डोंबिवलीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली आहे. मनसेच्या ५ ही नगरसेवकांनी शिवसेना शिंदेगटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता कल्याण-डोंबिवलीमध्ये शिंदेंचा महापौर होणार यावर शिक्कामोर्तब झाला. ५३ नगरसेवकांसह कोकणभवनामध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून गट स्थापन करण्यात आला.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ‘कल्याण- डोंबिवलीत मनसेने शिवसेनाला पाठिंबा दिला. कल्याण- डोंबिवलीमध्ये महायुतीचा महापौर होणार आहे. महापौर किंवा इतर पदांबाबत चर्चा नाही. महापौरपदाबाबत आता वरिष्ठ निर्णय घेतील. आम्ही भाजपला बाजूला ठेवणार नाही. रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे एकत्र बसूव चर्चा करतील. ठाकरेंची सेना सोबत आली तरी स्वागतच आहे. ‘
कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना शिंदे गटाने मनसेसोबत युती केली. कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे ५३ नगरसेवक विजयी झाले. तर भाजपचे ५० नगरसेवक निवडून आले. शिवसेना ठाकरे गटाचे ११ नगरसेवक आणि मनसेचे ५ नगरसेवक विजयी झाले. शिवसेना शिंदे गटाला महापौरपदासाठी बहुमताचा आकडा ६२ असणं आवश्यक आहे. आता शिंदे गटाला मनसेने पाठिंबा दिला. मनसेचे ५ नगरसेवक आणि शिंदे गटाचे ५३ नगरसेवक मिळून आकडा ५८ वर जात आहे. आता उर्वरीत ४ नगरसेवकांचा पाठिंबा मिळणं गरजेचे आहे.
अशातच ठाकरे गटाचे ४ नगरसेवक हे नॉटरिचेबल आहे. मंगळवारी शिवसेना ठाकरे गट कोकण विभगीय आयुक्तांकडे आपल्या गटाची स्थापना करण्यासाठी जात असताना ठाकरेंचे ४ नगरसेवक गैरहजर होते. यामधील २ नगरसेवक आधीपासूनच नॉटरिचेबल आहेत तर उर्वरीत दोन नगरसेवक है बैठकीला आले नाहीत. त्यामुळे हे चार नगरसेवक शिंदेगटाला पाठिंबा देणार की काय? अशी चर्चा कल्याण-डोंबिवलीमध्ये सुरू आहे.
