साकूर गटातील २१ बचत गटांना जनसेवा फाऊंडेशनमार्फत ७३ लाखांचे साहित्य निलम खताळ यांच्या हस्ते वाटप 

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर जिल्हा परिषद गटातील २१ महिला बचत गटांना जनसेवा फाऊंडेशनमार्फत प्रत्येकी एका बचत गटाला ३ लाख ५० हजार रुपयांचे किट सामाजिक कार्यकर्त्या निलम खताळ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. साकूर येथील आशिर्वाद मंगल कार्यालयात या वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ज्येष्ठ नेते बाळासाहेब खेमनर, भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले, खांबेचे सरपंच रविंद्र दातीर, सोनम कुडेकर, अमृता कोळपकर, भारत मुठे, सुनिता खेमनर, सुभाष पेंडभाजे, जनसेवा फाऊंडेशनची प्रकल्प अधिकारी रूपाली लोंढे, किरण पठारे, तेजेस गुळवे, निता कांदळकर आदि मान्यवर उपस्थित होते.

साकूर जिल्हा परिषद गटातील महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, आमदार अमोल खताळ यांनी विडा उचलला आहे. तसेच बचत गटांना व्यावसायात उतरण्यासाठी जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्येक बचत गटाला ३ लाख ५० हजार रुपयांच प्रत्येकी एक किट वाटप करण्यात आले. या किटमध्ये दोन पिठाच्या गिरण्या, दोन इलेक्ट्रॉनिक वजन काटे, पनोलायझर, दोन पॅकिंग मशीनचा समावेश होता. त्यामुळे आता महिला बचत गटांना या किटचा मोठा फायदा होणार आहे.

यावेळी निलम खताळ म्हणाल्या की, संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावातील बचत गटांना फायदा मिळाला आहे. बचत गटांना खुप संधी उपलब्ध आहे. बचत गटांमधून महिलांसाठी काम करण्याची संधी मिळत आहे. काम करताना कधीच स्वतः कमी लेखू नका. उलट एकमेकींच्या विचारांची देवाणघेवाण करा. महिलांमध्ये विविध गुण आहे त्या संधीच सोन करा व सादर करत चला असे निलम खताळ म्हणाल्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, महायुती सरकारमध्ये महिलांना समान हक्क आहे. या सरकारमध्ये महिलांना विविध योजनांचा लाभ मिळायला लागला. मोदी सरकारने जन धन योजना आणली त्याचा फायदा महिलांना मोठ्या प्रमाणात होतोय. तसेच जन्मापासून ते वयोवृद्ध पर्यंत योजना मिळत आहे. तसेच वाईट व्यक्ती नसते फक्त आपले विचार असतात. चांगल्या विचारांनी पुढे जात राहायचे. घरातील सासू सासऱ्यांचा आदर्श घ्या असे निलम खताळ यावेळी म्हणाल्या.

भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले म्हणाले की, पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांच्या अथक प्रयत्नातून २१ बचत गटांना जवळपास ७३ लाख ५० हजार रूपायांचे किट वाटप करण्यात आले. इथून पाठिमागे बचत गटांना कधीच साहित्य मिळत नव्हते, मात्र आता महायुती सरकारच्या काळात बचत गटांना लाभ मिळायला सुरुवात झाल्याने विरोधकांना जळजळ सुरू झाली आहे. गेली ४० वर्ष संगमनेरसह पठार भागावर राज्य केले त्यांनी बचत गटांकडे लक्ष दिले नाही, उलट काही कार्यक्रम असला की बचत गटांचा फक्त वापर करत विरोधकांनी केला असल्याचा आरोप यावेळी गुलाबराजे भोसले यांनी केला.

पुढे बोलताना भोसले म्हणाले की, पठारभागातील प्रत्येक बचत गटांना साहित्य वाटप होणार आहे. बचत गट समृद्ध करायच असेल त्यासाठी महिलांची एकिकरणाची गरज आहे. कारण ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी बचत गटांना किट वाटप करण्यात येत आहे. बचत गटांना अनुदान कसे मिळते, फायदा कसा घेता येईल यासाठी जनसेवा व आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाशीच संपर्क करावा. महिला बचत गटांवर निलम खताळ सतत लक्ष ठेवून आहे. जास्तीत जास्त नवीन बचत गट स्थापन करा. एकजीवाने सर्व बचत एकजूट राहिले तर सर्वांचा उद्धार होईल असेही शेवटी गुलाबराजे भोसले म्हणाले.

सरपंच रविंद्र दातीर म्हणाले की, पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांच्या अथक प्रयत्नांतून महिला बचत गटांना साहित्य वाटप करण्यात आले आहे. साकूर गटात आजपर्यंत बचत गटांना कधीच निधी, साहित्य भेटले नाहीत. ते फक्त जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून मिळायला सुरुवात झाली आहे. कारण विरोधकांनी ४० वर्ष फक्त महिलांचा मतदानासाठी वापर केला आहे. मात्र इथून पुढे एकही बचतगट वंचित राहणार नाही.

यावेळी सर्व महिला बचत गटातील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment