संगमनेर(DSNews24) भूमिअभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांना गेल्या ३३ वर्षांपासून जमीन एकत्रीकरणाच्या दुरूस्तीबाबत कुठलाही ठोस मार्गच निघत नसल्याने संगमनेर तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथील नवनाथ मोठ्याभाऊ ढेंबरे, पंढरीनाथ भाऊ ढेंबरे, योगेश सुभाष ढेंबरे, सुनिल सिताराम ढेंबरे, संदिप भानुदास ढेंबरे या शेतकऱ्यांनी २४ जानेवारीपासून संगमनेर येथील भूमि अभिलेख कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केल आहे. तसेच जोपर्यंत यावर ठोस निर्णय निघून भूमि अभिलेख विभागाचे अधिकारी लेखी देत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषणावरून उठणार नसल्याचा ठाम निर्णय उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी घेतलाय. दरम्यान ऐन २६ जानेवारीच्या तोंडावर या शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरु केल्याने भूमिलेख अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे उपोषणाच्या पहिल्याच दिवशी संगमनेर भूमि अभिलेख कार्यालयाचे उप अधिक्षक डॉ. योगेश थोरात यांनी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली. यावेळी डॉ. योगेश थोरात यांनी उपोषणकर्त्यांना सदर प्रकरणी संगमनेर उप अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडून दि. ३० जानेवारी २०२६ रोजी समक्ष जमीनीची मोजणी करण्यात येणार आहे. त्याबाबतची नोटीस संबंधितांना आमच्या कार्यालयाकडून पाठिवण्यात आली आहे. मोजणीकाम पुर्ण झाल्यानंतर सदर प्रकरणात दुरूस्ती योजना करण्याची कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र जोपर्यंत अहिल्यानगर, नाशिक विभागाचे अधिकारी सदर एकत्रीकरण जमीनीची दुरूस्ती प्रकरण किती दिवसात पुर्ण होईल असे लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषणावरून उठणार नसल्याचा सांगितले. त्यामुळे पहिल्या दिवशी कुठलाही तोडगा उपोषणावर निघाला नाही.
दरम्यान आमरण उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी देखील भूमिअभिलेख विभागाचे अधिकारी उपोषणकर्त्यांना विनवणी करून आमरण उपोषण सोडण्याची विनंती केली. तसेच तुमच्या विषयावर तोडगा काढू असे सांगितले. मात्र तरी देखील उपोषणकर्ते आपल्या मागणीवर ठाम असल्याने कुठलाही तोडगा निघाला नाही. दुपारनंतर उपोषणस्थळी सामाजिक कार्यकर्त्या निलम खताळ यांनी देखील भेट दिली. त्यांनी देखील उप अधिक्षक डॉ. योगेश थोरात यांच्याशी चर्चा केली.
त्यानंतर संगमनेर तालुका कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे यांनी उपोषणस्थळी धाव घेतली. यावेळी वंचितचे नेते अजिजभाई ओहरा, वंचित बहुजन आघाडीचे संगमनेर तालुकाध्यक्ष संपत कोळेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी वंचित संपत कोळेकर यांनी उप अधिक्षक डॉ. योगेश थोरात यांना धारेवर धरत उपोषणकर्त्यांच्या मागणीवर तोडगा का निघत नाही असे सुनावले.
यावेळी तालुकाध्यक्ष अजय फटांगरे यांनी उपोषणकर्त्यांशी सखोल चर्चा केली. तसेच उप अधिक्षक डॉ. योगेश थोरात यांच्याशी चर्चा करून यावर तोडगा काढाच अशी मागणी केली. तसेच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना थेट उपोषणस्थळावरून अजय फटांगरे यांना फोन लावला. तसेच यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उप अधिक्षक डॉ. योगेश थोरात यांना या प्रकरणावर गांभिर्याने लक्ष घालण्याचे सांगितले. यावेळी उपोषणकर्त्यांनी उपोषणस्थळी वैद्यकीय अधिकारी आले नसल्याचे सांगत एका उपोषणकर्त्याला अस्वस्थ वाटत आहे. यावेळी अजय फटांगरे यांनी तातडीने उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना फोन करून याबाबत माहिती दिली. तसेच उप अधिक्षक डॉ. योगेश थोरात यांना अजय फटांगरे यांनी तातडीने उपोषणकर्त्यांच्या मागणीवर ठोस निर्णय घेण्याचं सांगितले. त्यामुळे भूमि अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांची अक्षरशः धांदल उडाली होती. मात्र आजच उपोषणकर्त्यांच उपोषण सुटणार असल्याच चित्र दिसत आहे.
