मुंबई : अजित पवार यांच्या रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदी सुनेत्रा पवार यांची वर्णी लागली असून शनिवारी सायंकाळी अगदी साध्या पद्धतीने त्यांचा शपथविधी कार्यक्रम संपन्न झाला. या संपूर्ण कार्यक्रमावर दु:खाचे सावट होते.
गांभीर्यपूर्वक दृढकथन करून त्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यांच्या रुपाने महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभल्या आहेत. शपथविधीपूर्वी अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांनी अभिवादन केले.
कुटुंबावर ओढावलेले संकट बाजूला सारून पक्षाच्या भविष्याकरिता धीरोदात्तपणे सुनेत्रा पवार यांनी पुढे येऊन राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. विधिमंडळ गटनेतेपदी त्यांची निवड झाल्यानंतर शनिवारी सायंकाळी पाच वाजता त्यांचा शपथविधी कार्यक्रम संपन्न झाला. राज्याच्या इतिहासात पहिल्याच महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची नोंद झाली आहे. शपथविधीवेळी राष्ट्रवादीच्या आमदारांनी अजितदादा अमर रहे, एकच वादा अजितदादा, अशा घोषणा दिल्या. त्यांच्या घोषणांनी राजभवनाचा दरबार हॉल दुमदुमून गेला होता.
शपथविधीनंतर सुनेत्रा पवार तातडीने बारामतीला रवाना, ‘तोपर्यंत’ मंत्रालयात येणार नाही
शपथविधी कार्यक्रम झाल्याबरोबर सुनेत्रा पवार तातडीने बारामतीला रवाना होणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र जय पवार असतील. शपथविधीनंतर सार्वजनिक जीवनात लगोलग सक्रीय न होता किंबहुना शासनाची सूत्रे लगोलग हातात न घेता अजित पवार यांचा दशक्रिया विधी होईपर्यंत बारामतीमध्येच थांबणार असल्याचा निर्णय सुनेत्रा पवार आणि कुटुंबाने घेतला आहे. खातेवाटप जाहीर झाले तरीही दुखवटा संपेपर्यंत मंत्रालयात न येण्याचे त्यांनी ठरवले आहे.
तत्पूर्वी राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची एकमताने विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. तसेच पक्षाचे सर्वाधिकार देखील त्यांच्याकडे बहाल करण्यात आले.
