धाराशिव – गरीब शेतकऱ्यांची सरकारकडून कर्जमाफी केली जाणार आहे. शेतकरी कर्जमाफीचा दिलेला शब्द सरकार नक्की पाळेल, असा ठाम विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.
फार्महाऊसधारक किंवा धनदांडग्या शेतकऱ्यांचा (Farmers) विचार न करता, वर्षानुवर्षे शेतात राबणाऱ्या गरीब शेतकऱ्यांसाठीच कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. कर्जावर व्याज आणि व्याजावर व्याज वाढत असल्यामुळे शेतकरी आत्महत्येचा विचार करतो, मात्र अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना एकटे सोडणार नाही. गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी (Farmer loan) सरकार करणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितले. धाराशिव जिल्ह्यातील येणेगुर येथे झालेल्या सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं असू, पुढील काळात शेतकऱ्यांना कर्ज घ्यावं लागू नये, असा विचारही सरकार करत असल्याचं त्यांनी म्हटले आहे.
गरीब शेतकरी 40 – 40 वर्षे शेतात राबतात. कर्जबाजारी होऊन आत्महत्येचा विचार करतात. या शेतकऱ्यांना आम्ही आत्महत्या करू देणार नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे महायुती सरकारकडून लवकरच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राज्य सरकार कर्जमाफीच्या निर्णयाची घोषणा कधी करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र, बावनकुळे यांनी फक्त गरीब शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळेल, असे म्हटले आहे. त्यामुळे गरीब शेतकऱ्यांच्या निकषात नेमके कोणते शेतकरी बसणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना वगळले जाणार, शेतकऱ्यांची गरिबी ठरवण्याचा मापदंड काय असणार, हे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.
