पुणे: “शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी आधीच निर्णय घेतलेला आहे. सध्या माहिती संकलनाचे काम सुरू असून, एप्रिलपूर्वी माहिती उपलब्ध होणार आहे.
परदेशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल येईल. ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय होईल,” असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं आहे.
‘सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी घ्यावी, अशी आमदारांची भावना असली, तरी तेराव्या दिवसानंतरच सर्व वरिष्ठ नेते आणि आमदार एकत्र बसून निर्णय घेतील. सध्या पवार कुटुंब दुःखात आहे. तेरा दिवस पूर्ण होईपर्यंत या विषयावर चर्चा करणे योग्य नाही. त्यानंतर सर्वांच्या भावना ऐकून निर्णय होईल,’ अशी ठाम भूमिका दत्तात्र्यय भरणे यांनी बारामती येथे स्पष्ट केली आहे.
भरणे म्हणाले, ‘उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे. आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत असा विश्वास त्यांना दिला. दादांच्या नंतर या राज्यातील जनतेच्या अपेक्षा आहेत आपण सर्वजण एकत्र काम करू, असेही त्यांना सांगितले. मात्र, या भेटीत कोणताही राजकीय विषय झाला नसून, केवळ अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. सुनेत्रा पवार यांनी राज्य, देश आणि पक्षाची जबाबदारी सांभाळावी. याबाबत कोणताही निर्णय घाईघाईने न घेता सर्वांच्या भावना ऐकून योग्य तो निर्णय घेतला जाईल.’
