मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात एका अंपायरचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. बुधवारी (18 फेब्रुवारी) उत्तर प्रदेशातील उन्नावमधील केडीएमए मैदानावर सामना सुरु असतानाच मधमाशांनी हल्ला केला. यामध्ये 65 वर्षीय अंपायर मानिक गुप्ता यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.अनेक खेळाडूदेखील यामध्ये जखमी झाले होते. गुप्ता हे गेल्या 30 वर्षांपासून अंपायरिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या निधनानंतर क्रिकेट विश्वात मोठी शोककळा पसरली होती. मधमाशांच्या हल्ल्यात गुप्ता यांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात असले तरीही त्यामागे नेमके काय कारण आहे, जाणून घेऊया.
सामना सुरु असतानाच मधमाशांचा हल्ला
बुधवारी वायएमसीसी आणि पॅरामाउंट क्लब यांच्यात लीग सामना सुरु होता. सामना सुरु असताना अचानक मधमाश्यांच्या एका मोठ्या थव्याने खेळाडू आणि पंचांवर हल्ला चढवला. यावेळी अंपायर मानिक गुप्ता यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, मात्र मधमाश्यांनी त्यांना चहूबाजूंनी घेरले आणि शरीराच्या विविध भागांवर डंख मारण्यास सुरुवात केली. हा हल्ला इतका भीषण होता की, काही वेळातच गुप्ता मैदानात बेशुद्ध होऊन पडले.
रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू
मैदानातील उपस्थित सदस्यांनी त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालात नेले. मात्र त्या ठिकाणी उपचार न झाल्याने त्यांना कानपूर मेडिकल कॉलेज आणि नंतर कार्डिओलॉजी विभागात हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मानिक गुप्ता हे कानपूरच्या परेड खान परिसरातील रहिवासी होते आणि केसीए पॅनलमधील एक अत्यंत सन्मानित आणि अनुभवी पंच म्हणून ओळखले जात होते.
नेमका मृत्यू कशामुळे?
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, मधमाश्यांच्या डंखात एलर्जन मेथो नाईक ॲसिड मोठ्या प्रमाणात असते. यामुळे पीडित व्यक्तीचा रक्तदाब आणि हृदयाचे ठोके अचानक वाढतात. यामुळे शरीरावर सूज आणि लालसरपणा येतो. याच कारणामुळे गुप्ता यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
