छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वाळूज महानगर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं पोलिसांनी गस्त घालत असताना एका रिक्षाची तपासणी केली.
यावेळी रिक्षामधील दृश्य बघून पोलीस पथकाचा देखील थरकाप उडाला आहे. रिक्षात एका २० वर्षीय तरुणीचा गादीत गुंडाळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. हा प्रकार उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून पुढील तपास केला जात आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगर परिसरात उघडकीस आली आहे. येथील तिसगाव चौफुली येथे गादीत गुंडाळलेल्या अवस्थेत २० वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित रिक्षात घरातील काही साहित्यांसोबत मृतदेह गादीत गुंडाळून रिक्षातून गावाकडे नेला जात होता. मात्र हा प्रकार संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी रिक्षा अडवून तपासणी केली असता तरुणीचा मृतदेह आढळून आला.
प्राथमिक चौकशीत सावत्र आईने, “मुलीचे प्रेमसंबंध होते. त्यातून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. आम्ही अंत्यसंस्कारासाठी मृतदेह गावाकडे नेत होतो,” अशी माहिती दिल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी सावत्र आई-वडिलांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी संशयास्पद मृत्यूची नोंद केली असून सखोल तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीती आणि संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे.
