Petrol-Diesel Price : मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचा परिणाम आता इंधनाच्या दरांवरही दिसू लागला आहे. पाकिस्तान सरकारने पेट्रोल आणि हाय-स्पीड डिझेलच्या किमतीत प्रति लिटर ५५ पाकिस्तानी रुपयांची वाढ केली आहे.
ही वाढ आतापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ मानली जात आहे. पाकिस्तानचे पेट्रोलियम मंत्री अली परवेज मलिक, उपपंतप्रधान व परराष्ट्र मंत्री इसहाक डार आणि वित्त मंत्री मुहम्मद औरंगजेब यांनी शुक्रवारी मध्यरात्री ही घोषणा केली. सरकारने देशात पेट्रोलियमचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचेही स्पष्ट केले आहे.
डिझेलचा दर ३३५.८६ रुपये प्रति लिटर
दरवाढीनंतर पाकिस्तानमध्ये हाय-स्पीड डिझेलची डिपोपूर्व किंमत पुढील आठवड्यासाठी ३३५.८६ पाकिस्तानी रुपये प्रति लिटर निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी हा दर २८०.८६ रुपये प्रति लिटर होता. म्हणजेच सुमारे २० टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे पेट्रोलची डिपोपूर्व किंमत २६६.१७ रुपयांवरून वाढवून ३२१.१७ रुपये प्रति लिटर करण्यात आली आहे. ही जवळपास १७ टक्क्यांची वाढ असल्याचे सांगितले जात आहे.
