राष्ट्रवादीतील घडामोडी हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. शरद पवारांनी भाकरी फिरवण्याची जाहीर केले. पण त्यांनी आता तवाच फिरवला व त्यांच्या जुन्या सवयी प्रमाणे त्यांनी स्वतःचा शब्द फिरवला आहे.
त्यामुळे लोक आता संभ्रमात नाहीत, तर त्यांनी स्वतःचा राष्ट्रवादी पक्षच संभ्रमावस्थेत टाकला आहे, अशी टीका पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी येथे केली.
नगर येथे खरीप आढावा बैठकीनिमित्त विखे पाटील आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपद सोडणे व पुन्हा स्वीकारणे या घडामोडीबाबत बोलताना ते म्हणाले, जनतेमध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्याची भूमिका मांडणे ही पवारांची सवय आहे, पण आता त्यांनी घेतलेली भूमिका ही त्यांच्या पक्षालाच संभ्रमावस्थेत टाकून गेली आहे. त्यांच्या जुन्या सवयीप्रमाणे त्यांनी स्वतःचे शब्द फिरवले आहेत, असा दावा विखे यांनी केला.
