ब्रेकिंग! शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सभागृहात मोठी घोषणा

राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सभागृहात एक अतिशय मोठी घोषणा केली आहे.

शेतकरी कर्जमाफीबाबत प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल अपेक्षित आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार हे 30 जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय जाहीर करतील, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधान परिषदेत दिली.

कलम 260 अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना कृषीमंत्री भरणे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. राज्यातील शेती अधिक सक्षम, आधुनिक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्यासाठी महाराष्ट्राने 2025 ते 2029 या कालावधीसाठी स्वतंत्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण जाहीर केले असून असे धोरण राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

पीक विमा, नुकसानभरपाई आणि अतिवृष्टी मदत

राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मागील 9 वर्षांत सुमारे 37,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसानभरपाई देण्यात आली आहे. खरीप 2025-26 पासून उत्पादनावर आधारित सुधारित पीक विमा योजना लागू केली आहे. बीड पॅटर्न 80-110 मॉडेल राबवून विमा कंपन्यांच्या नफ्यावर 20 टक्क्यांची मर्यादा घालण्यात आली आहे. वन्यप्राणी आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी भरपाई देण्याचा निर्णय केंद्राने घेतल्याची माहितीही कृषीमंत्र्यांनी दिली.

फेब्रुवारी ते डिसेंबर 2025 या काळात अतिवृष्टीमुळे 1.36 कोटी शेतकरी बाधित झाले. 1.06 कोटी हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. यासाठी 20,194 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून त्यापैकी 15,661 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. मदतीची मर्यादा 2 हेक्टरवरून 3 हेक्टरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

मोफत वीज, पाणंद रस्ते आणि कर्जमाफी

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना अंतर्गत साडेसात हॉर्सपॉवरपर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीज देण्यात येत आहे. दोन वर्षांत 41,415 कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना’ मार्फत शेतकऱ्यांना शेतापर्यंत रस्ता सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे.

माय ॲग्री धोरणातून एआय, ड्रोन आणि रोबोटिक्सचा वापर

राज्यात हवामानातील अनिश्चितता, कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव, उत्पादन खर्चातील वाढ आणि बाजारभावातील चढ-उतार यामुळे शेती अधिक जोखमीची झाली आहे. या पार्श्वभूमीवर दीर्घकालीन उपाय म्हणून ‘माय ॲग्री’ एआय धोरण आखण्यात आले आहे. या अंतर्गत हवामानाचा अचूक अंदाज, कीड-रोगाचा पूर्व इशारा, सिंचन आणि खत व्यवस्थापन मार्गदर्शन, बाजारभावाचा अंदाज, पीक उत्पादन वाढ होईल. यासाठी एआय, जनरेटिव्ह एआय, ड्रोन तसेच रोबोटिक्सचा वापर होणार आहे. राज्यस्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ॲग्रीटेक नावीन्य केंद्र स्थापन करण्यात आले असून चारही कृषी विद्यापीठांत एआय संशोधन व इन्क्युबेशन सुविधा उभारल्या जाणार आहेत.

महाविस्तार अॅपला 30 लाख शेतकऱ्यांचा प्रतिसाद

कृषी विभागाने विकसित केलेल्या महाविस्तार मोबाईल अॅपचा 30 लाखांहून अधिक शेतकरी वापर करत आहेत. या अॅपद्वारे पीक लागवड, रोगनियंत्रण, पाणी-खत व्यवस्थापन आणि बाजारभावाची माहिती घरबसल्या मिळते. 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी मुंबईत एफॉरॲग्री जागतिक परिषद पार पडली असून त्यात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांसह शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

Leave a Comment