संगमनेरमध्ये खळबळ! चिमुरडीवर ॲसिड हल्ला 

संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे एक संतापजनक घटना घडली आहे. इयत्ता सहावीत शिकणाऱ्या एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अज्ञात माथेफिरूने अ‍ॅसिड फेकून हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली आहे. शाळा सुटल्यानंतर घराकडे जात असताना हा प्रकार घडला असून, या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव पान येथील जिल्हा परिषद शाळेत सदर मुलगी शिक्षण घेत आहे. नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर ती आपल्या घराच्या दिशेने जात होती. यावेळी एका अज्ञात युवकाने अचानक तिच्यासमोर येऊन तिच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकले. अ‍ॅसिड पडताच वेदनेने विव्हळत मुलीने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. तिचा आवाज ऐकून आसपासचे नागरिक मदतीसाठी धावले, मात्र तोपर्यंत आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी जखमी मुलीला तातडीने उपचारासाठी हलवले. प्रकृतीचे गांभीर्य लक्षात घेता तिला पुढील उपचारासाठी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच संगमनेर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

Leave a Comment