महाराष्ट्र हादरला! नवरा – बायकोने शेतातच घेतला गळफास…

जळगाव: लग्न बंधनात अडकल्यानंतर पती-पत्नीकडून आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचं वचन दिलं जातं. मात्र जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील शिवापूर येथे एक मन हेलावणारी घटना घडली असून पती-पत्नीने शेतातच दोरीच्या साह्याने गळफास घेऊन मृत्युला कवटाळलं आहे.

शिवापूर येथील भगवान पोपट जाधव (वय 38) आणि आशाबाई भगवान जाधव (वय 27) या दोघेही पती-पत्नीने आपल्या शेतात एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हा हादरून गेला. दोघही मुलं बाहेर असताना दोघेही पती-पत्नीच्या मनात नेमके वादळ काय सुरू होते? याची लेकरांनाही कल्पना नव्हती.

मिळालेल्या माहितीनुसार, जाधव पती-पत्नी हे नेहमीप्रमाणे शिवापूर शिवारातील आपल्या शेतातच वास्तव्यास होते. भगवान जाधव हे शेती सोबतच मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. शुक्रवारी मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास भगवान जाधव आणि आशाबाई जाधव या दोघांनी घरापासून काही अंतरावर असलेल्या उंबराच्या झाडाला एकाच दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. ज्या दुचाकीवर हे दाम्पत्य त्या ठिकाणी गेले ती दुचाकी झाडाच्या खाली लावलेली होती आणि दुचाकीवर चढून दोघांनी झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेत जीवनयात्रा संपवली.

सकाळी आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी हे शेतात कामानिमित्त गेले असता त्यांना झाडाला जाधव पती-पत्नी लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. या शेतकऱ्यांनी तात्काळ याबाबतची माहिती परिसरात दिल्यानंतर तिथं इतरही नागरिक जमा झाले. जाधव यांच्या नातेवाईकांनी तातडीने दोघांना खाली उतरवून चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले.

दरम्यान, भगवान जाधव आणि आशाबाई जाधव यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन लहान मुलं आहेत. ही दोन्ही मुले शिक्षणासाठी सध्या बाहेरगावी राहत असल्याने या भीषण घटनेवेळी ती घरी नव्हती. आई-वडिलांच्या या टोकाच्या निर्णयामुळे ही दोन्ही लेकरं आता पोरके झाली आहेत. जाधव पती-पत्नीने आत्महत्या का केली, याबाबतचे कारण अद्याप उघड होऊ शकले नसून याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.

Leave a Comment