नाशिकमधील बहुचर्चित अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत असून या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवली आहे. एसआयटीकडून खरातची कसून चौकशी सुरू असताना त्याची पत्नी कल्पना खरात गेल्या अनेक दिवसांपासून फरार आहे. या प्रकरणात पहिल्यांदाच खरातच्या सासूबाई पार्वती शिंदे समोर आल्या असून त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना भावनिक प्रतिक्रिया दिली. “जावई सुटला नाही तरी चालेल, पण माझी मुलगी सुखरूप परत यावी,” अशी आर्त विनंती त्यांनी केली.
त्या पुढे म्हणाल्या, “आमच्या खानदानात असं कधीच घडलं नाही. माझी मुलगी खूप साधी आणि भोळी आहे. तिने कुणाला कधी काही बोललं नाही. तिच्या नशिबी हे का आलं, हे कळत नाही. ती फक्त घरी परत यावी, एवढीच इच्छा आहे.”
दरम्यान, पोलिसांनी कल्पना खरातचा शोध घेण्यासाठी अनेक पथके तैनात केली असून तिच्या मैत्रिणी आणि नोकरांचीही चौकशी करण्यात येत आहे. तरीदेखील अद्याप ती पोलिसांच्या हाती लागलेली नाही.
