शरद पवारांना धक्का? सुजय विखेंनी दिले मोठे संकेत ; राजकीय घडामोडींना वेग

भाजपाचे नेते तथा माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं आहे. ‘आता कोणत्याही बांधावर गेलात तरी फक्त ‘कमळ’च दिसेल’ असं म्हणत ‘आता भाजपात तीन-तीन ‘दादा’ दिसतील’ असं भाष्य करत सुजय विखे यांनी मोठे संकेत दिले आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं. सुजय विखे यांनी नेमकं काय संकेत दिले?

सुजय विखे यांनी काय संकेत दिले?

“मी आता माझ्या कारखान्याचा शेतकी अधिकारी देखील झालो आहे. आता मीच तुम्हाला ऊसतोड देणार आणि मीच सर्व काही बरोबर मार्गी लावतो. अगोदर काय व्हायचं की कारखान्याची ऊसतोड या बांधावरून थोडीशी दुसरीकडे सरकली की लगेच तनपुरेंच्या शेतात गेली म्हणायचे, किंवा विखे पाटलांच्या शेतात, अशा चर्चा व्हायच्या. मात्र, आता असा काही विषयच राहिला नाही. आता कोणताही बांध ओलांडला तरी फक्त ‘कमळ’च दिसेल. त्यामुळे काही फरक पडत नाही. हे मी माझा त्रास कमी करण्यासाठी केलं हे मी तुम्हाला सांगतो”, असं सुजय विखे यांनी म्हटलं आहे.

आता तीन-तीन ‘दादा’ एकत्र

“याआधी फक्त ‘कमळा’साठी एकच ‘दादा'(सुजय दादा) वर भागायचं. आता तीन-तीन ‘दादा’ (अक्षय दादा, प्राजक्त दादा आणि सुजय दादा) मग काय घ्या मजा करून. मला काही वेळापूर्वीच एकजण म्हणाले की काहीजण आपल्याकडे येत आहेत. मी त्यांना म्हणालो की कोणालाच एकट्याला आणू नका. एक-एक प्रवेश कशाला करायचे? ‘पॅकेज’ म्हणजे पूर्ण समुहाने पक्षात घ्यायचं. हा जो सर्व काही कार्यक्रम झालेला आहे, त्यामध्ये माझं थोडंफार योगदान निश्चित आहे”, असं सूचक भाष्य करत सुजय विखे पाटील यांनी मोठे संकेत दिले आहेत.

Leave a Comment