संसाराची राखरांगोळी….आजारी पत्नीसाठी पती औषधे आणायला गेला अन् घरी येताच….

कल्याण : औषधं आणण्यासाठी घराबाहेर पडलेला नवरा घरी कधी येतोय, याची वाट पाहणाऱ्या आजारी पत्नीसोबत नियती क्रूरपणे वागली. औषधं आणण्यासाठी धडधाकटपणे घराबाहेर पडलेल्या नवऱ्याचा मृतदेहच घरी आल्यानं पत्नीसह कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

कल्याण-मुरबाड मार्गावरील रायते पुलावर झालेल्या भीषण अपघातात गणपती मधे या प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला. औषधांच्या प्रतीक्षेत असलेल्या पत्नीला पतीच्या मृतदेहाचेच अंत्यदर्शन घ्यावे लागल्याने संपूर्ण मुरबाड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

नेमकं काय घडलं?

मुरबाडच्या देवळारवाडी परिसरात राहणारे गणपती मधे यांची पत्नी आजारी होती. त्यांच्या उपचारासाठी आवश्यक असलेली औषधे आणण्यासाठी ते सकाळी कल्याणला आले होते. औषधे घेऊन गावी परतण्यासाठी त्यांनी कल्याणवरून एका ‘इको’ व्हॅनमध्ये प्रवास सुरू केला. चालकाने नेहमीप्रमाणे गाडीत ११ प्रवासी कोंबले होते आणि रस्ता मोकळा असल्याने गाडी वाऱ्याच्या वेगाने धावत होती.

रायते पुलाचे काम सुरू असल्याने तिथे रस्ता अरुंद आणि अनेक ठिकाणी खोदलेला आहे. तरीही प्रवाशांच्या जिवाशी खेळत चालकाने वेग कमी केला नाही. सकाळी १०:३० च्या सुमारास समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सरला जागा देण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटले आणि व्हॅन थेट मिक्सरवर जाऊन धडकली. या धडकेत व्हॅनचा अक्षरशः चक्काचूर झाला. मधे यांच्यासह इतर प्रवाशांना काय घडतंय हे समजण्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला.

हृदयद्रावक अंत

घरी औषधं घेऊन येणाऱ्या पतीच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या आजारी पत्नीला जेव्हा अपघाताची बातमी समजली, तेव्हा तिचा आधारच हिरावला गेला होता. औषधांऐवजी पतीचा मृतदेह समोर पाहताच नातेवाईक आणि शेजाऱ्यांचा काळजाचा ठोका चुकला. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून उत्तरीय तपासणीनंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. या अपघातामुळे ओव्हरलोड आणि वेगाने धावणाऱ्या प्रवासी वाहनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Leave a Comment