ब्रेकिंग! अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणात मोठी अपडेट समोर 

Ajit Pawar : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी हे प्रकरण आता गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपवण्यात आले आहे.

कर्नाटकात दाखल झालेला हा गुन्हा झिरो एफआयआरद्वारे महाराष्ट्रात वर्ग करण्यात आला असून, बारामती पोलिसांनंतर आता राज्य सीआयडी या प्रकरणाचा तपास करणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, आमदार रोहित पवार यांनी या अपघाताबाबत संशय व्यक्त करत सखोल तपासाची मागणी केली होती. त्यांच्या आग्रहानंतर कर्नाटक पोलिसांनी झिरो एफआयआर नोंदवला होता. तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा गुन्हा महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार, पाच दिवसांपूर्वीच हा तपास बारामती पोलीस ठाण्याकडे देण्यात आला होता. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेता, राज्य शासनाने हा तपास सीआयडीकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी कर्नाटक पोलिसांनी नोंदवलेले जबाब आणि गोळा केलेले पुरावे आता सीआयडीच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. बारामतीमध्ये आधीच गुन्हा दाखल असल्याने नवीन एफआयआरची गरज भासणार नाही; सीआयडी जुन्या गुन्ह्याच्या आधारेच पुढील तांत्रिक तपास करणार आहे.

या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले असून, सीआयडीच्या तपासातून नेमके काय निष्पन्न होते. याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment