संगमनेर – गेल्या काही दिवसांपासून अकोले व संगमनेर तालुका तीव्र उन्हामुळे भाजून निघत आहे. सुमारे 41 अंश सेल्सिअसपेक्षा पुढे तापमान जात आहे. या तीव्र उन्हामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. प्रशासन उन्हाच्या यलो अलर्टच्या सूचना देत आहे. मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे लोक त्या सूचनांकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहेत.
परंतू अकोले तालुक्यातील कळस येथील दिगंबर जनार्दन वाकचौरे ( वय ४५ ) या शेतकर्याचा उष्माघातामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. 26) दुपारी 3 वाजेच्या सुमारास संगमनेर येथे घडली. उष्माघाताचा अकोलेतील हा पहिला बळी ठरला आहे.
दिगंबर वाकचौरे हे भरउन्हात कळसहून मोटारसायकलवर संगमनेर येथे गेले होते. तेथील पानसरे हॉस्पिटल येथे बहीण ऑपरेशनसाठी उपचार घेत आहे म्हणून तिला भेटण्यासाठी गेलेले असताना उन्हाचा त्रास झाला. त्रास होऊ लागल्यामुळे डॉ. पानसरे यांच्या हॉस्पिटलसमोरील हॉटेलमधून त्याने पिण्यासाठी थंड पाण्याची बाटली विकत घेतली व उकाडा अधिक जाणवत असल्याने व त्रास होत असल्याने त्यांनी पाणी बाटली डोक्यावर ओतली.
परंतु त्याला चक्कर येऊन तेथेच जमिनीवर कोसळून मृत झाले होते. त्यानंतर डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तेथूनच एका रुग्णवाहिकेतून मृतदेह घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. याबाबत शहर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
