भाजपचे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र अक्षय कर्डीले यांनी विजय मिळविला आहे. त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांचा पराभव केला.
भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांनी तब्बल एक लाखापेक्षा अधिक मतांनी विजय मिळवला आहे. सकाळी आठ वाजेपासून सुरू झालेल्या मतमोजणीत पहिल्या फेरीपासूनच अक्षय कर्डिले यांनी आघाडी घेतली होती, जी प्रत्येक फेरीगणिक वाढत गेली. २६ व्या फेरीअखेर कर्डिले यांनी १ लाखाचा टप्पा ओलांडून विरोधकांचा सुपडा साफ केला.
विजयानंतर अक्षय कर्डीले काय म्हणाले?
विजयानंतर पत्रकारांशी बोलताना अक्षय कर्डिले म्हणाले कि, “आज माझे वडील असते तर खूप आनंद झाला असता. मला ज्यांनी ज्यांनी मदत केली मी त्यांना कधी विसरू शकत नाही. हा विजय म्हणजे शिवाजी कर्डिले साहेबांवर जनता किती प्रेम करते हे या मताच्या माध्यमातून दिसले. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जनतेसाठी काम केले, तसाच माझा देखील शेवटचा श्वास हा जनतेच्या सेवेसाठीच राहील. येत्या काळात सर्वांना मदत करणार” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
२६ व्या फेरी अखेर मिळालेली मते
अक्षय कर्डिले – १३४४४६
गोविंद मोकाटे- २६९६१
संतोष चोळके- ५५१८
अपक्ष रावसाहेब खेवरे- ७२०७
