संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील पिंपळगाव देपा शिवारातील मोधळवाडी घाटाजवळ आयशर टेम्पो खाली चिरडून दोन महिला जागीच ठार झाल्याची घटना मंगळवार दि. ५ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. जया दत्तात्रय थोरात ( वय २९ ) अस्मिता दादाभाऊ थोरात ( वर १६ ) रा. मोधळवाडी ता. संगमनेर असे मयतांचे नाव आहे. या घटनेनंतर चालक आयशर टेम्पो सोडून पसार झाला आहे. मात्र या घटनेने पिंपळगाव देपा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, आयशर टेम्पो मोधळवाडी घाट चढून पिंपळगाव देपाकडे येत होता. तसेच जया थोरात व अस्मिता थोरात यांच्यासह एक जण मोटारसायकलवरून घाट उतरत होते. यावेळी घाटाच्या वरती आयशर टेम्पो आला असता मोटारसायकलला धडक दिली. या धडकेत मोटारसायकलवरील जया थोरात व अस्मिता थोरात आयशरखाली सापडले गेले. त्यामुळे दोघींचा जागीच मृत्यू झाला.
आयशर टेम्पो चालकाने घटनास्थळावरून पळ काढून पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घारगाव पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक गांधले, प्रमोद गाडेकर, सुभाष बोडखे, चौधरी, हांडे, ढोकरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आयशर टेम्पो ताब्यात घेतला. तसेच जया थोरात व अस्मिता थोरात यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान या घटनेबाबत घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
