Thalapathy Vijay : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली असून अभिनेता-नेते थलपती विजय यांच्या तामिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाने दमदार कामगिरी करत १०८ जागांवर विजय मिळवला आहे.
अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या पक्षाने DMK आणि AIADMK सारख्या प्रस्थापित पक्षांना मोठा धक्का दिला.
विधानसभेचा निकाल स्पष्ट झाल्यानंतर आता विजय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. त्यांनी दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवत दोन्ही ठिकाणी मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. (Thalapathy Vijay)
पेरंबूर मतदारसंघातून विजय यांनी आर. डी. शेखर यांचा तब्बल ५३,७१५ मतांनी पराभव केला, तर तिरुचिरापल्ली (Trichy East) येथे इनिगो इरुदयाराज यांना २७,४१६ मतांनी हरवले. निकालानंतर विजय पेरंबूर मतदारसंघ कायम ठेवण्याची शक्यता असून, कमी मताधिक्याने जिंकलेल्या तिरुचिरापल्ली पूर्व मतदारसंघातील आमदारकीचा राजीनामा देऊ शकतात, अशी माहिती समोर येत आहे. (Thalapathy Vijay )
२३४ सदस्यीय तामिळनाडू विधानसभेत बहुमतासाठी ११८ जागांची गरज असताना TVK ला १०८ जागांवरच समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी विजय यांचा पक्ष काँग्रेस पक्ष आणि डाव्या पक्षांसोबत युती करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. या निवडणुकीत DMK ला ५९, तर AIADMK ला ४७ जागा मिळाल्या आहेत.
पेरंबूर हा DMK चा बालेकिल्ला मानला जात असताना विजय यांनी येथे विजय मिळवत आपली लोकप्रियता सिद्ध केली आहे. तामिळनाडूतील मतदारांनीही TVK ला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिल्याने राज्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाल्याचे मानले जात आहे.
