संगमनेर(DSNews24/किरण पुरी) मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील शेणगाव पंचायत समितीतील नेमणूक केलेल्या अधिकाऱ्यांच्या पथकाचा संगमनेर तालुक्यात ग्रामपंचायतींचा तालुकास्तरीय तपासणी दौरा सुरू आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात संगमनेर तालुक्यातील साकूरसह २८ ग्रामपंचायतींची निवड केली आहे. त्या पार्श्वभूमीवर साकूर ग्रामपंचायतीने राबविलेल्या विकासकामांची शेणगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश कांबळे, बालविकास अधिकारी विवेक वाकोडे, विस्तार अधिकारी माधव कोकाटे, गट व्यवस्थापक विनोद बनसोडे या तालुकास्तरीय समितीने तपासणी करत गावाची पाहणी केली. या समितीच्या तपासणीनुसार विविध विषयांचे गुण ग्रामपंचायतींना दिले जातात.
यावेळी तालुकास्तरीय समितीने ग्रामपंचायतीचे विविध दप्तरांसह कागदपत्रांची तपासणी केली. तपासणीवेळी समितीने गावातील आरोग्य, स्वच्छता, पाणी नियोजन, दप्तर माहिती, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, शौचालय, सौर उर्जा, शाळांबाबत माहिती, शासकीय इमारती, आठवडे बाजार, महिला बालकल्याण, वित्त आयोग, आर्थिक उत्पन्न, रस्ते, स्मशानभुमी, जलजीवन मिशन, आदी विविध विषयांची विस्तृत माहिती सरपंच, ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून घेतली.
तालुकास्तरीय तपासणी समितीने साकूर गावातील जलशुद्धीकरण प्रकल्प, जिल्हा परिषद शाळा, वाचनालय, व्यायामशाळा, स्मशानभूमी, तसेच खंडोबा डोंगराच्या पायथ्याशी ग्रामपंचायत अंतर्गत राबविलेल्या नक्षत्र घनवण उद्यान व तुलसी वृंदावन व वृक्ष लागवडीची प्रत्यक्ष पाहणी केली. सर्व विकासकामांची अचूक माहिती तालुकास्तरीय तपासणी समितीला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा उपसरपंच शंकरराव खेमनर यांनी दिली. या पाहणीवेळी ग्रामपंचायतीने विविध योजनांअंतर्गत लोकाभिमुख केलेली कामे बघून तालुकास्तरीय तपासणी समिती भारावून गेली. तसेच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायतीने राबविलेल्या उपक्रमांच या समितीन कौतुक केलं.
यावेळी यावेळी सरपंच सचिन सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा उपसरपंच शंकरराव खेमनर, विस्तार अधिकारी काशिनाथ सरोदे, ग्रामविकास अधिकारी नागेश पाबळे, तालुका समन्वयक राजू सरोदे, आरोग्य सेवक विलास दिघे, ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.
