छत्रपती संभाजीनगर : एकीकडे अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान होणं आता नवीन राहिलं नाही. तरी या संकटाला तोंड देऊन शेतकरी कसं बसं पिक घेतो. पण, जेव्हा मार्केटमध्ये विक्रीला जातो तिथेही थट्टा उडवण्याचा प्रकार घडतो.
शेतमालाला भाव किती कमी असू शकतो, याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका शेतकऱ्याने 1262 किलो कांदा विकला. पण, या शेतकऱ्याला एक रुपयाही यात मिळाला नाही. उलट अडत्याला उलट १ रुपये द्यावा लागला.
राज्यात सध्य कांद्याचे भाव कोसळले आहे. कांद्याला १ रुपया भाव मिळत असल्यामुळे शेतकरी आंदोलन करत आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील वरुडी गावातील शेतकरी प्रकाश गलधर यांनी १२ क्विंटल कांदा अत्यंत आशेनं बाजार समितीत विक्रीसाठी आणला.
रक्ताचं पाणी करून पिकवलेला हा कांदा सोन्यासारखा भाव देईल, अशी अपेक्षा होती. मात्र, कांद्याचे पडलेले दर पाहता या शेतकऱ्याच्या पदरात कांदा विक्रीचे पैसे मिळणे तर लांबच, पण प्रकाश गलधर यांना आपल्या खिशातून ‘एक रुपया’ बाजार समितीला भरावा लागला. ही घटना म्हणजे राज्यातील कृषी व्यवस्थेचा आणि कोसळलेल्या दरांचा जिवंत पुरावा आहे.
लग्नाची देणी कशी देऊ?
“१२ क्विंटल कांदा मी काढला होता. तो विकण्यासाठी घेऊन गेलो, पण अडत्याला हमाली, तोलाई, भाडे देऊन हातात एक रुपया मिळाला नाही. माणसाला वाटतं पैसे आले पाहिजे. माझ्या मागे लग्नाची देणी होती, पोरीचं लग्न झालं, ५-६ लाख रुपये देणे आहे. पण, हातात एक रुपया आला. माझीच परिस्थिती नाही तर गावात सगळ्यांची परिस्थितीत आहे. कुठे ३ रुपये ४ रुपये भाव मिळत आहे, तोही चांगला कांदाा असेल तर कुठे थोडा खराब असेल तर २ रुपये भाव मिळत आहे, अशी व्यथा शेतकरी प्रकाश गलधर यांनी मांडली.
१ रुपया व्यापाऱ्याला कसा द्यावा लागला?
प्रकाश गलधर यांनी १२६२ किलो म्हणजे जवळपास १२ क्विंटल कांदा घेऊन आले होते. कांद्याला भाव हा १०० रुपये लावण्यात आला. यामध्ये हमाली १२५ रुपये द्यावी लागली, तोलाई खर्च ३८ रुपये, भराई २५ रुपये, वाराई २५ रुपये, गोणी ५५० रुपये आणि भाडे ५०० रुपये द्यावे लागले होते. त्यामुळे एकूण रक्कम ही १२६२ होती आणि वजा खर्च हा १२६३ रुपये निघाला. त्यामुळे १ रुपये शेतकऱ्याला द्यावा लागला.
