महाराष्ट्रात कधी येणार मान्सून, हवामान खात्याने तारीखच सांगितली……

राज्यात सध्या उन्हाचा कडाका शिगेला पोहोचला असून नागरिक पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत. अशातच हवामान विभागाने एक दिलासादायक अपडेट दिली आहे. यंदा मान्सून वेळेपेक्षा थोडा उशिरा दाखल होणार आहे. १६ मेपर्यंत तो अंदमानात धडक देण्याची दाट शक्यता आहे. मात्र, पाऊस येईपर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. हिटवेवमुळे कोकण, विदर्भ-मराठवाड्यातील काही पट्ट्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

कसा असेल मान्सूनचा प्रवास

भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील दक्षिण भाग, निकोबार बेटे आणि अंदमान समुद्रामध्ये मान्सून दाखल होण्यासाठी हवामान अत्यंत अनुकूल आहे. १६ मे पर्यंत साधारणपणे मान्सून अंदमान आणि निकोबारमध्ये दाखल होऊ शकतो. ३ ते ५ जून दरम्यान केरळ आणि तिथून तो तळ कोकणात दाखल होईल. महाराष्ट्राच्या वेशीवर मान्सूनला येण्यासाठी साधारणपणे 9 ते 10 जून उजाडेल असा आतातरी प्राथमिक अंदाज आहे. मुंबई आणि पुण्यात साधारणपणे १२ ते १४ जून उजाडण्याची शक्यता आहे.

अवकाळी पावसाचं संकट

मान्सून थोडा उशिरा येणार असला तरी यादरम्यान अवकाळी पावसाचं संकट मात्र कायम आहे. दुपारी कडकडीत ऊन आणि संध्याकाळी पावसाचं धुमशान अशी परिस्थिती महाराष्ट्रात पाहायला मिळू शकते. मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगड या भागांत ताशी ५० किलोमीटरपर्यंत वेगवान वाऱ्यांसह तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे; तर दुसरीकडे, दक्षिण द्वीपकल्पीय भारतात तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये देखील गारपीट, अवकाळी पावसाचं संकट ओढवलेलं आहे. अवकाळी पाऊस पडत असला तरी उष्ण वाफाही तेवढ्याच वाढत असल्याने लोक हैराण झाले आहेत.

Leave a Comment