लग्नानंतर अवघ्या १२ दिवसात तलाठी युवकाने आयुष्य संपवलं

बीडच्या अंबाजोगाई शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकलेल्या एका तरुणाने गळफास घेऊन आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. तलाठी असलेल्या तरुणाने आत्महत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. बीडच्या अंबाजोगाईच्या मोरेवाडी परिसरात ही घटना घडली आहे. गणेश दत्तू कोळी असे मृत तरुणाचे नाव आहे. ते चंद्रपूर महसूल विभागात तलाठी म्हणून कार्यरत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, तलाठी असलेल्या गणेश कोळी यांचा विवाह अवघ्या १२ दिवसांपूर्वीच झाला होता. लग्न झाल्यानंतर गणेश हे बायकोसोबत अंबाजोगाईतील मोरेवाडी भागात भाड्याच्या खोलीत राहत होते. त्यांची बायको देखील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या फॉरेन्सिक विभागात कंत्राटी तत्त्वावर कार्यरत आहेत. त्या दिवशी त्या नेहमीप्रमाणे ड्युटीसाठी बाहेर गेल्या होत्या. गणेश यांनी घरात गळफास घेतल्याचे समोर आलंय.

घटनेची माहिती पोलिसांनी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतलं. त्यानंतर शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. तलाठीच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणी पोलिसांनी विविध अंगांनी तपास सुरू केला आहे.

नवविवाहित दाम्पत्याच्या आयुष्यात आनंदाचे क्षण सुरू असतानाच तरुणाने टोकाचा निर्णय घेतला. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. परिसरातही या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. तलाठी गणेश कोळी यांनी इतके टोकाचं पाऊल का उचलले, यावरून परिसरात चर्चा सुरू झाली आहे. तलाठी कोळी यांच्या आत्महत्येनंतर त्यांचे प्रशासनातील सहकारी देखील हळहळ व्यक्त करताहेत.

Leave a Comment