संगमनेर(DSNews24 / किरण पुरी) तालुक्यातील हिवरगाव पठार परिसरात बुधवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार धुमाकूळ घातला. पावसात मच्छिंद्र झुंबर दुधवडे ( वय ३५) रा. गिऱ्हेवाडी या शेतकऱ्यावर वीज कोसळली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
ब्रेकिंग! हिवरगाव पठार येथे वीज पडून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, साकूर पठार भागात खळबळ
मिळालेली माहिती अशी की, साकूरसह परिसरात बुधवार दि. २७ मे रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास अचानक मान्सूनपूर्व पावसाने जवळपास अर्धा तास जोरदार हजेरी लावली होती. यावेळी जोरदार वारा, मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह परिसरात पावसाने दाणादाण उडावून दिली होती. हिवरगाव पठार शिवारातील गिऱ्हेवाडी येथील दगड सोंडवाडी वस्तीवर देखील वादळी वाऱ्यासह पावसाने धुमाकूळ घातला होता. यावेळी नागरिकांची एकच धांदल उडाली होती.
याचवेळी पाऊस आल्याने मच्छिंद्र झुंबर दुधवडे हे शेतकरी मोटारसायकलवरून घराकडे निघाले होते. काही अंतरावर घरापर्यंत पोहचणार तितक्याच आकाशातून वीज थेट मच्छिंद्र दुधवडे यांच्यावर कोसळली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, प्रमोद गाडेकर, सुभाष बोडखे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मच्छिंद्र दुधवडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. यावेळी थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर, युवा नेते बाळासाहेब सागर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दुधवडे कुटुंबियांना धीर दिला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
