हिंगोली-रिसोड राज्यमार्गावर एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी अपघाताची घटना समोर आली आहे. पिकअप आणि बुलेट यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सेनगाव शहराजवळ हा अपघात घडला असून, गजानन पत्की आणि संतोष देसाई अशी मृत्यू झालेल्या शिक्षकांची नावे आहेत. या भीषण घटनेमुळे संपूर्ण पंचक्रोशीत आणि शिक्षकांच्या मूळ गावावर शोककळा पसरली आहे.
नेमकी घटना काय?
मृत्यू झालेले दोन्ही शिक्षक हिंगोली जिल्ह्यातील वरुड चक्रपान या गावातील रहिवासी होते. शासकीय कर्तव्यावर असताना, जनगणनेचे काम आटोपून ते दोघे बुलेटने रिसोड येथे आपल्या पाहुण्यांकडे गेले होते. पाहुण्यांकडील पाहुणचार घेऊन ते रात्रीच्या सुमारास परतीच्या प्रवासाला निघाले. दरम्यान, सेनगाव शहराच्या जवळ येत असताना एका भरधाव पिकअप वाहनाने त्यांच्या बुलेटला जोरदार धडक दिली.
हा अपघात इतका भयानक होता की, पिकअपची धडक बसताच बुलेट गाडीचा आणि दोन्ही शिक्षकांच्या शरीराचा अक्षरशः चक्काचूर झाला. धडक लागल्यानंतर दोन्ही शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेतली. अपघातानंतर पिकअप चालकाने मानवतेला काळिमा फासत, जखमींना मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून वाहन घेऊन पळ काढला आहे. सध्या पोलीस या फरार चालकाचा शोध घेत आहेत.
गजानन पत्की आणि संतोष देसाई हे दोघेही जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असल्याने परिसरात त्यांचा मोठा जनसंपर्क होता. जनगणनेचे काम करून सुखरूप परत येतील अशी आशा असताना, अचानक त्यांच्या मृत्यूची बातमी धडकल्याने वरुड चक्रपान गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन हसत्या-खेळत्या शिक्षकांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने स्थानिक नागरिक आणि शिक्षण वर्तुळातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
