मोठी बातमी ! माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP Sharad Pawar) माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी आज (दि. ३० मे) भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. मुंबईतील भाजप कार्यालयात दुपारी तीन वाजेच्या सुमारास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

यावेळी अहिल्यानगरचे माजी खासदार सुजय विखे तसेच नगरसेवक व पक्ष प्रवक्ता नवनाथ बन उपस्थित होते. दरम्यान पक्ष प्रवेशानंतर प्राजक्त तनपुरे यांना अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तनपुरे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली होती. आपण पक्ष का सोडत आहोत, यामागील कारणांची माहिती त्यांनी सुळे यांना दिल्याचे सांगितले जाते. त्यानंतर आज भाजप प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत त्यांनी अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला. तनपुरे यांच्या या निर्णयामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील आगामी निवडणुकांच्या राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment