नैऋत्य मान्सूनने शनिवारी तळकोकणात प्रवेश करत महाराष्ट्रातील पावसाळ्याची अधिकृत सुरुवात केली. मान्सूनच्या पुढील वाटचालीस वातावरण अनुकूल असल्याने तो लवकरच राज्याच्या उर्वरित भागातही दाखल होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 48 तास राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस, मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रविवारी राज्यातील 25 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून सोमवारी 21 जिल्ह्यांसाठी यलो, तर सहा जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे.
वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस –
दक्षिण कोकण, गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या भागांत ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असून विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी लागण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात हलक्या ते मध्यम –
उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. या भागांतही ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
दरम्यान, उत्तर कोकणातील काही भागांत पावसासोबतच उष्ण व दमट हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात नागरिकांना पावसाच्या सरींबरोबरच उकाड्याचाही सामना करावा लागू शकतो.
या जिल्ह्यांना यलो अलर्ट –
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या 25 जिल्ह्यांना रविवारी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विभागनिहाय अंदाज
कोकण : बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून काही ठिकाणी जोरदार सरी कोसळू शकतात. किनारपट्टी भागात सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र : काही ठिकाणी पाऊस पडेल. तुरळक भागांत जोरदार पावसासह मेघगर्जना आणि वादळी वारे अपेक्षित आहेत.
मराठवाडा : काही भागांत पावसाची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहू शकतात.
विदर्भ : तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असून मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यांची शक्यता आहे.
तापमानात घट होण्याची शक्यता –
राज्यातील कमाल तापमान पुढील दोन दिवसांत 2 ते 3 अंश सेल्सिअसने घटण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील किमान तापमानातही पुढील चार ते पाच दिवसांत घट होण्याची शक्यता आहे.
