जांबुत बुद्रुक येथील शाळेच्या पहिल्या दिवशी कार्यक्रमात त्रृटी ; आ.अमोल खताळ यांचे मुख्याध्यापकावर कारवाईचे निर्देश 

संगमनेर(DSNews24) शाळेचा आज पहिला दिवस आहे. पुढील आठ दिवसांत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत शालेय साहित्याचे वाटप पूर्ण झाले पाहिजे. तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील एकही विद्यार्थी शालेय साहित्यापासून वंचित राहिला नाही पाहिजे याची शिक्षणविभागाने दक्षता घ्यावी असे निर्देश आमदार अमोल खताळ यांनी देत महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाच्या वतीने ‘शाळा प्रवेशोत्सव’ अभियानांतर्गत जांबुत बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश वाटप करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार खताळ बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड, भाजप जेष्ठ नेते बाळासाहेब खेमनर, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख, भाजप तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले, शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख संदीप खिलारी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजू कातोरे, ऍड अमित धुळगंड, किशोर खेमनर, सुरेश भागवत, इसाक पटेल, पांडुरंग शेटे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आमदार खताळ म्हणाले की, जांबुत जिल्हा परिषद शाळेत परिसरातील आदिवासी वाडी-वस्त्यांवरील तसेच गोरगरिब कुटुंबांतील मुले शिक्षणासाठी येतात. त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची खरी गरज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, शिक्षणमंत्री दादा भुसे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके, बूट, सॉक्स तसेच अन्य शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले जात असते. मात्र काही ठिकाणी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही याची खंत आमदार खताळ यांनी व्यक्त केली.

आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमुळे शाळेची पटसंख्या आज टिकून आहे, त्यामुळे त्यांना दर्जेदार शिक्षण देणे ही शिक्षकांची फार मोठी जबाबदारी आहे. याच शाळेतून गोरगरिबांचे विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात शिक्षण क्षेत्रात तसेच प्रशासकीय क्षेत्रात जाऊन या गावाचे नाव उज्वल करतील असा विश्वास आमदार खताळ यांनी व्यक्त केला.

संगमनेर तालुक्यातील जांबुत बुद्रुक जिल्हा परिषदेच्या शाळेत अनेक त्रुटी निदर्शनास आल्या, त्या सर्व त्रुटी दूर करण्याबाबत आ. अमोल खताळ यांनी पंचायत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड यांना देत कार्यक्रमात त्रुटी ठेवणाऱ्या मुख्याध्यापकांवर कारवाई करा असे सक्त निर्देश आमदार खताळ यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले. त्यावर त्रुटी मान्य करत गटशिक्षणाधिकारी गुंड यांनी दिलगिरी व्यक्त केली. “राहिलेल्या सर्व त्रुटी तातडीने दूर करण्यात येतील. शासनाच्या सर्व योजना विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी शिक्षण विभाग कटिबद्ध राहील असे संगमनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड यांनी सांगितले”

Leave a Comment