विद्या प्रबोधिनी प्रशालेत नवीन विद्यार्थ्यांचे प्रेमळ शब्दांनी स्वागत

संगमनेर(DSNews24 /किरण पुरी) तालुक्यातील साकूर येथील विद्या प्रबोधिनी प्रशालेत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाचा शाळा प्रवेशोत्सव चैतन्यमय, आनंददायी वातावरणात मोठ्या उत्साहात सोमवारी साजरा करण्यात आला. शाळेतर्फे इयत्ता पहिली ते दहावीमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या मुलांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांना फुगे, खाऊ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

तसेच मुलांना शाळेची गोडी लागावी, भीती वाटू नये यासाठी पहिल्या दिवशी त्यांना आवडतील अशा गोष्टी वर्गांमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. तसेच शाळा परिसरात विद्यार्थ्यांसाठी अतिशय आकर्षक आणि विलोभनीय सजावट करण्यात आली होती. रंगीबेरंगी फुलांच्या माळा, फलक, असे सर्जनशील डेकोरेशनने संपूर्ण शाळाच विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सजविण्यात आली होती.

वर्गखोल्याही आकर्षक पद्धतीने सजवण्यात आल्या होत्या. फुलांनी, चित्रांनी, फुग्यांनी सजवलेली शाळा, युनिफॉर्म घालून पाठीवर वेगवेगळ्या आकाराची, रंगाची दप्तरे घेतलेली, आई-बाबांचा हात घट्ट धरून रडत असलेली तर काही हिरमुसलेल्या चेहर्‍याने गप्प उभी असलेली मुले शाळेत दिसून आली. तर काही कुतूहलाने बघत असलेली, हसत, खेळत असलेली मुले, रडणार्‍या मुलांना समजावत असलेले शिक्षक असे दृश्य शाळेच्या पहिल्या दिवशी बघायला मिळाले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष इंद्रजीत खेमनर, उपाध्यक्ष शंकरराव खेमनर, सेक्रेटरी भाऊसाहेब सागर, सर्व संचालक मंडळ, रजिस्ट्रार हेमचंद्र होळकर, शिक्षण विस्तार अधिकारी ठोकळ, प्राचार्या गुलशन जमादार, मुख्याध्यापक सुभाष घुगरकर, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवीन सर्व विद्यार्थ्यांचे प्रमुख मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन प्रेमळ शब्दांनी स्वागत केले. तसेच नवीन शैक्षणिक वर्षांसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय जीवनातील आनंद, शिस्त, ज्ञान आणि मूल्यशिक्षण यावर आधारित प्रेरणादायी मार्गदर्शनही करण्यात आले. नव्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह पाहता हे शैक्षणिक वर्ष सकारात्मक सुरुवातीसह पुढे जाईल, असे चित्र स्पष्ट झाले.

Leave a Comment