नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे (वय 65) याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयाने आज हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
यापूर्वी न्यायालयाने भीमराव कांबळेला दोषी ठरविले होते. त्यानंतर त्याला फाशीची शिक्षा होणार की जन्मठेप, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अखेर न्यायालयाने हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याचे नमूद करत आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, गुन्हा घडल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत तपास, पुरावे आणि न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून निकाल देण्यात आला. त्यामुळे अत्याचार आणि हत्या प्रकरणातील राज्यातील सर्वात जलदगतीने निकाली निघालेल्या खटल्यांपैकी हा एक ठरला आहे.
1 मे रोजी घडली होती संतापजनक घटना
1 मे रोजी पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या अमानुष घटनेनंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. विविध सामाजिक संघटना, नागरिक आणि राजकीय पक्षांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती.
त्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास पूर्ण करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षाने सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले आणि आता त्याला फाशीची शिक्षा सुनावली आहे.
या निकालामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत असली, तरी अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर अंमलबजावणी आणि समाजात जनजागृती होण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त केली जात आहे.
