राज्यात सर्वत्र मान्सून सक्रिय झालाय. महामुंबईसह राज्यभरात मध्यम ते जोरदार सरी कोसळत आहेत. तर आणखी दोन दिवस हा पावसाचा जोर कायम राहणार आहे. आज संपूर्ण कोकण पट्ट्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
तर ठाणे, रायगड जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील परिसराला हवामान विभागानं रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात बुलढाणा, अकोला आणि अमरावतीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. महामुंबईत शनिवारी आणि रविवारी पावसाचा जोर अधिक राहील. हे दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे महामुंबईत सखल भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे.
कल्याण, डोंबिवलीत शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
हवामान खात्याच्या अतिवृष्टीच्या सूचनेनंतर कल्याण डोंबिवली प्रशासन सतर्क झालं आहे. याच पार्श्वभूमीवर आज 4 जुलै रोजी शनिवारी कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली असल्याने तेदेखील बंद राहणार आहेत. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या शिक्षकांच्या सुरक्षिततेसाठी केडीएमसीच्या शिक्षण विभागाने आदेश दिले आहेत.
4 जुलैला हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे मुसळधार,अति मुसळधार पाऊस होऊन पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय. यामध्ये प्राथमिक ,माध्यमिक, उच्च माध्यमिक महाविद्यालयांचा समावेश आहे.
पालिका कर्मचाऱ्यांच्या सुट्टयाही रद्द
त्याचबरोबर यादरम्यान आपातकालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी 4 आणि 5 जुलै असे दोन दिवस महापालिकेचे सगळे विभाग प्रमुख, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त या सगळ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या वतीने 12 ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहेत. या नियंत्रण पक्षाच्या माध्यमातून आपातकालीन परिस्थिती उद्भवल्यास त्या संदर्भाची माहिती मिळून तात्काळ उपयोजना केला जाईल अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आलीय. शिवाय महापालिका हद्दीतील नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा ,अन्यथा पडू नये असे देखील आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे.
४ जुलै रोजी ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी
भारतीय हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यासाठी ४ व ५ जुलै रोजी रेड अलर्ट जारी करून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी ४ जुलै रोजी ठाणे जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या तसेच प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून संबंधित आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून कोकण किनारपट्टीवर समुद्र खवळला आहे. समुद्रकिनारी राहणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला असून, पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
