राज्यात अधूनमधून २०१९ मधील पहाटेच्या शपथविधीवरून विविध दावे केले जातात. आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या शपथविधीसंदर्भात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोठा दावा केला आहे. यामुळे शपथविधीच्या चर्चांमध्ये मोठा ट्विस्ट आला आहे.
यापूर्वी पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवार यांचाच हात होता, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले होते. त्यावेळी ती चर्चा चांगलीच रंगली होती. आता सुधीर मुनगंटीवार यांनी हा शपथविधी उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी होता, असे सांगितले आहे.
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन करण्यासाठी अजित पवार तयार झाले. आम्हालाही उद्धव ठाकरे यांना धडा शिकवायचा होता. कारण त्यांनी शिवसैनिकांचा अवमान केला होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा अवमान केला होता.
शिवसैनिकास सोडून स्वत: मुख्यमंत्री झाले होते. मग अजित पवार सोबत येण्यास तयार झाले. यामुळे संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे, असे समजून तो शपथविधी झाला, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. अजित पवार सोबत आले तेव्हा कोणतीही अट टाकलेली नव्हती. ते उपमुख्यमंत्री होणार होते. त्यामुळेच सरकार आले, असे त्यांनी सांगितले.
