अहिल्यानगर ब्रेकिंग! शाळेतून घरी येणाऱ्या १२ वर्षीय मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

नेवासा (प्रतिनिधी) – पावसामुळे विजेच्या खांबात वीजप्रवाह उतरल्याने शाळेतून घरी येत असलेल्या १२ वर्षीय मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नेवासा तालुक्यातील सुरेगावगंगा येथे घडली.

याबाबत बाळासाहेब उत्तमराव गायकवाड (वय ३८, रा. सुरेगावगंगा) यांनी नेवासा पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, शनिवारी (दि. ४ जुलै) दुपारी सुमारे पावणेदोन वाजण्याच्या सुमारास ते शेतात काम करत होते. त्यावेळी त्यांचा पुतण्या श्रवण प्रवीण गायकवाड (वय १२) हा शाळेतून वाहनातून उतरून पायी घरी येत असताना पावसामुळे विजेच्या खांबात उतरलेल्या करंटचा त्याला जोरदार धक्का बसला. त्यामुळे तो जागीच बेशुद्ध पडला.

घटनेनंतर नातेवाईकांनी श्रवणला तातडीने खासगी वाहनातून ग्रामीण रुग्णालय, नेवासा येथे दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment