संगमनेर (DSNews24/किरण पुरी) – महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे हे शनिवार, दि. १८ जुलै रोजी संगमनेर तालुक्याच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या दौऱ्यात ते विशेषतः साकूर येथे भेट देणार असून, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन तथा सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते बाजीराव पा. खेमनर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देणार आहेत. या भेटीमुळे तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकीय व सहकार क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे.
दौरा कार्यक्रमानुसार, सभापती राम शिंदे हे दुपारी १.०० वाजता मुंबई येथून मोटारीने साकूरकडे प्रयाण करतील. सायंकाळी ५.३० वाजता ते साकूर येथे बाजीराव पा. खेमनर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देतील. त्यानंतर सायंकाळी ७.०० वाजता ते मोटारीने संगमनेरकडे रवाना होणार आहेत.
सध्या अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशा परिस्थितीत सहकार क्षेत्रातील प्रभावी नेतृत्व मानले जाणारे माजी चेअरमन बाजीराव पा. खेमनर यांच्या निवासस्थानी सभापती राम शिंदे यांची होणारी भेट विशेष महत्त्वाची मानली जात आहे.
या भेटीत नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा होणार, याबाबत अधिकृत माहिती नसली तरी जिल्हा बँकेच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे उद्याचा हा दौरा केवळ सदिच्छा भेट न राहता आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
