मोठी बातमी! ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने घेतली विधानसभा उपाध्यक्षांची भेट, केली मोठी मागणी

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेल्या निकालानुसार १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाच्या शिष्टमंडळाने सोमवार (दि.१५) रोजी विधानभवनात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narahari Zirwal) यांना भेटून केली. यावेळी शिष्टमंडळाने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत आणि मागणीचे निवेदन झिरवळ यांना दिले…

राज्यातील सत्तासंघर्षांवर सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात ११ मे रोजी निकाल दिला. ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्र करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात केली होती. या मागणीवर विधानसभा अध्यक्षांनी सुयोग्य वेळेत निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सोमवार (दि.१५) रोजी विधानभवनात झिरवळ यांची भेट घेतली.

या भेटीनंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी उपाध्यक्षांकडे आम्ही न्यायालयाच्या निकालाची प्रत आणि मागणीचे निवेदन सोपवल्याचे सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने १६ आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्याची सूचना केली आहे.

त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीची प्रक्रिया सुरु करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी आम्ही पत्राद्वारे केली आहे. मणिपूरमध्ये जशी लवकर सुनावणी झाली तशी सुनावणी व्हावी, असेही प्रभू म्हणाले.

तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आज उपस्थित नसल्याने आम्ही उपाध्यक्षांना भेटून निवेदन दिले.आमचे निवेदन उपाध्यक्षांच्या मार्फत अध्यक्षांकडे जाईल. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या चौकटीतच आम्ही १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्याची मागणी केल्याचे प्रभू यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे आमदार उपस्थित होते.

Leave a Comment