बिरेवाडीत ‘नवचेतना व आधारशिला’ मेळावा उत्साहात

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून बालकांच्या शारीरिक, बौद्धिक, सामाजिक व भावनिक विकासाला चालना देण्याबरोबरच पालकांचा सक्रिय सहभाग वाढावा, या उद्देशाने संगमनेर तालुक्यातील साकूरजवळील बिरेवाडी येथील गावठाण अंगणवाडी केंद्रात एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प घारगाव-१ यांच्या वतीने ‘नवचेतना व आधारशिला’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. बालविकास प्रकल्प अधिकारी निलेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा उत्साहात पार पडला.

मेळाव्याचे उद्घाटन सरपंच शितल ढेंबरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वरवंडी बीटच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका सोनाली कुलधरण, तालुका गट समन्वयक ऋषिकेश सागर, ग्रामसेवक सागर रसाळ, शिक्षक सतीश रोकडे यांच्यासह वरवंडी बीटमधील अंगणवाडी सेविका, मदतनीस व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे, पालकांचा अंगणवाडी केंद्रातील सहभाग वाढवणे तसेच अंगणवाडी केंद्र हे बालकांच्या आनंदी व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे केंद्र बनवणे, हा मेळाव्याचा प्रमुख उद्देश होता. यावेळी ० ते ३ वर्षे तसेच ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांसह गरोदर व स्तनदा मातांसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले.

‘आधारशिला’ उपक्रमांतर्गत ३ ते ६ वर्षे वयोगटातील मुलांना खेळाच्या माध्यमातून शिक्षण देण्यात आले. बालकांच्या हाताच्या स्नायूंचा विकास तसेच औपचारिक लेखनाची पूर्वतयारी व्हावी, यासाठी रांगोळीमध्ये गिरवणे, गोल काढणे आदी कृती घेण्यात आल्या. बालकांचा विकास केवळ पुस्तकी शिक्षणातून होत नसून, खेळ, कृती आणि प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

‘टाकाऊपासून टिकाऊ’ या संकल्पनेतून घरच्या घरी विविध वस्तू तयार करून त्यांचा बालकांच्या विकासासाठी उपयोग कसा करता येतो, याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. तसेच रंगीबेरंगी झुंबरासारख्या वस्तूंच्या माध्यमातून ० ते ६ महिन्यांच्या बालकांच्या दृष्टी विकासाला चालना कशी देता येते, याबाबत पालकांना मार्गदर्शन करण्यात आले.

पर्यवेक्षिका सोनाली कुलधरण व अंगणवाडी सेविकांनी मातांचा गट तयार करून बालसंगोपन, बालकांचा सर्वांगीण विकास आणि पालकांची भूमिका याबाबत मार्गदर्शन केले.

मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस व ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले.

Leave a Comment