मोठी बातमी! कॉंग्रेस नेत्याच्या घरावर गोळीबार, महाराष्ट्रात खळबळ 

नागपूर : नागपूर शहरात मध्यरात्री काँग्रेस नगरसेवकाच्या घरावर गोळीबार झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. वाठोडा परिसरातील काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घराच्या दिशेने दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, गोळीबारामुळे घराच्या काचा फुटल्या असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा थरारक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती आहे.

मध्यरात्री दोन अज्ञातांनी घरावर झाडल्या गोळ्या

वाठोडा परिसरातील शुभम मोटघरे यांच्या घरावर मध्यरात्रीच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्ती आले. या दोघांनी मोटघरे यांच्या घराच्या दिशेने गोळीबार केला आणि त्यानंतर घटनास्थळावरून पसार झाले. अचानक झालेल्या गोळीबाराच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली. गोळीबाराच्या वेळी नगरसेवक शुभम मोटघरे आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब घरातच उपस्थित होते. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य आणखी वाढले आहे. सुदैवाने गोळीबारात घरातील कोणालाही गोळी लागली नाही. मात्र, गोळ्या लागल्याने घराच्या काचा फुटल्या आहेत.

गोळीबाराचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

या घटनेचा संपूर्ण थरारक प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दोन अज्ञात व्यक्ती घराजवळ येताना आणि गोळीबार करून घटनास्थळावरून पसार होताना दिसत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात दिसत आहेत. पोलिसांकडून आता या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसराची पाहणी करून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. गोळीबार करणारे दोन्ही आरोपी सध्या फरार असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.

दरम्यान, गोळीबाराच्या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. राजकीय वैमनस्य, पूर्वीचा वाद वा अन्य कोणत्या कारणातून हा हल्ला करण्यात आला का? याचा तपास पोलीस करत आहेत.

Leave a Comment