संगमनेर(DSNews24/किरण पुरी) एकीकडे रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा होत असतानाच दुसरीकडे संगमनेर तालुक्यातील साकूर येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. साकूर शिवारातील मांगमळई परिसरात ३५ वर्षीय विवाहित महिलेने झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी उघडकीस आली. या घटनेने साकूर परिसरात खळबळ उडाली आहे.
भागूबाई काशिनाथ खेमनर (वय ३५, रा. हिरेवाडी, ता. संगमनेर) असे मृत महिलेचे नाव आहे.
घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. साकूर येथील मातोश्री हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकेतून भागूबाई खेमनर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी लोणी येथे पाठविण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, भागूबाई खेमनर या जुन्नर तालुक्यातील आळेफाटा परिसरात मेंढ्या चारण्यासाठी वास्तव्यास होत्या. २१ ऑगस्ट २०२६ रोजी डौकेनगर, आळेफाटा येथील राहत्या घरातून ‘माझी भावजय आजारी असून तिला दवाखान्यात घेऊन जायचे आहे,’ असे सांगून त्या घराबाहेर पडल्या होत्या. त्यानंतर त्या घरी परतल्या नाहीत.
भागूबाई बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी २१ ऑगस्ट रोजी आळेफाटा पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तब्बल सात दिवसांनी त्यांचा मृतदेह साकूर शिवारातील मांगमळई परिसरात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
भागूबाई यांनी हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा तपास घारगाव पोलीस करत असून ही आत्महत्या आहे की घातपात यामागचे कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.
