कर्जत : कर्जत तालुक्यातील खुरंगेवाडी येथे महाविद्यालयीन युवक-युवतीचे मृतदेह विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वैष्णवी विलास जगधने (वय १७ वर्षे १० महिने) आणि वैभव भाऊसाहेब शिंगाडे (वय २० वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही घरातून बेपत्ता असल्याची माहिती मिरजगाव पोलिसांनी दिली.
कुटुंबीय व नातेवाईकांकडून दोघांचा शोध सुरू असताना २ सप्टेंबर रोजी सकाळी गावाजवळील बसस्थानकापासून सुमारे ४०० मीटर अंतरावर असलेल्या विहिरीजवळ वैभवची चप्पल आणि वैष्णवीचे दप्तर आढळून आले. त्यामुळे कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच मिरजगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विहिरीत शोधमोहीम सुरू केली. यावेळी विहिरीत वैष्णवीचा मृतदेह आढळून आला. तिच्या अंगावर शालेय गणवेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतदेह मिरजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.
दरम्यान, सायंकाळी त्याच विहिरीत वैभवचाही मृतदेह आढळून आला. दोन्ही मृतदेह बाहेर काढून पुढील वैद्यकीय कार्यवाही करण्यात आली.
या घटनेप्रकरणी मिरजगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दोघांचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला की या घटनेमागे अन्य काही कारण आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिस तपासानंतरच घटनेचे कारण समोर येणार आहे.
या घटनेमुळे खुरंगेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
