नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात भूकंपाच्या धक्क्यांचे सत्र सुरूच असून, शुक्रवारी रात्री ऐन गणेशोत्सवाच्या उत्साहात नागरिक आरतीसाठी एकत्र जमले असतानाच अचानक जमीन हादरल्याने एकच खळबळ उडाली. एकापाठोपाठ भूकंपाचे दोन सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली. अनेकांनी घराबाहेर तसेच मोकळ्या मैदानाकडे धाव घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सुमारे ७.१९ वाजता सुरगाणा तालुक्यातील घाटमाथ्यावरील डांगराळे, शिंदे दिगर, रोकडपाडा, कुंभीपाडा आणि भरडमाळ परिसराला भूकंपाचा धक्का जाणवला. या धक्क्याची तीव्रता ३.४ रिश्टर स्केल इतकी असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर रात्री सुमारे १०.४० वाजता पुन्हा कमी तीव्रतेचा धक्का जाणवल्याने नागरिकांची चिंता आणखी वाढली.
आरती सुरू असतानाच जोरदार आवाज अन् जमीन हादरली
शिंदे दिगर येथील पोलीस पाटील काशिनाथ पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावात गणपतीची आरती सुरू होती. आरतीसाठी नागरिक मोकळ्या मैदानात एकत्र जमले होते. त्याचवेळी अचानक जमिनीतून जोरदार आवाज झाला आणि जमीन हादरल्याचे नागरिकांना जाणवले. या अनपेक्षित घटनेमुळे काही क्षणांतच नागरिकांमध्ये घबराट पसरली आणि धावपळ सुरू झाली.
यापूर्वीही सुरगाणा तालुक्यातील काही भागांत भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये आधीच भीतीचे वातावरण आहे. त्यातच शुक्रवारी रात्री पुन्हा दोन धक्के जाणवल्याने सुरगाणा घाटमाथ्यावरील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, वारंवार जाणवणाऱ्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.
