मनोज जरांगे यांची प्रकृती नाजूक, पुढील ५ ते ६ दिवस….

छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 20 दिवसांचे उपोषण केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. उपोषणानंतर गॅलेक्सी रुग्णालयात उपचार घेत आहेत. दीर्घकाळ उपोषण केल्यामुळे शरीरावर परिणाम झाला असून अशक्तपणा आणि इतर त्रास जाणवत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. सध्या त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक बनली आहे. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्या आरोग्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या शरीरातील पाण्याची पातळी (हायड्रेशन) अत्यंत कमी झाली असून त्यांच्या किडनी आणि हृदयावर सूज आली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा बांधवांना पुढील 5 ते 6 दिवस त्यांना भेटायला न येण्याचे आणि आरामासाठी सहकार्य करण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

नेमकं डॉक्टर काय म्हणाले?

मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्या तब्येतीविषयी महत्त्वाची माहिती दिली. डॉक्टरांनी सांगितले की, जरांगे पाटील यांची प्रकृती सध्या अत्यंत नाजूक आहे. त्यांना उपचारादरम्यान उलट्यांचा त्रास होत आहे. त्यामुळे आजपासून त्यांना पुन्हा पूर्णपणे द्रवरूप आहारावर शिफ्ट करण्यात आले आहे. पुढील दोन ते तीन दिवस त्यांना कोणतेही अन्न खाण्यास देता येणार नाही. ते सध्या केवळ पाणी आणि ज्यूसवरच राहतील.

पाच ते सहा दिवस भेट टाळण्याचे आवाहन

जरांगे पाटील यांना सध्या आरामाची अत्यंत सक्त गरज आहे. डॉक्टरांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, मी एक डॉक्टर म्हणून सर्व मराठा बांधवांना नम्र विनंती करतो की, पुढील 5 ते 6 दिवस कुणीही जरांगे पाटील यांना भेटण्याचा आग्रह धरू नये. त्यांच्या तब्येत पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी उपचारासोबतच पूर्ण विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी भेट देणे टाळावे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून असून वैद्यकीय उपचार वेगाने सुरू आहेत.

20 दिवसांच्या उपोषणानंतर रुग्णालयात उपचार

मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी 20 दिवस उपोषण केले. प्रकृती खालावल्यानंतर आणि सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चेनंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. सरकारला मागण्यांवर कार्यवाही करण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने जरांगे यांना छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आता जरांगे यांच्या प्रकृतीत किती लवकर सुधारणा होते आणि मराठा आरक्षणाशी संबंधित जिल्हास्तरीय समित्यांच्या कामाला प्रत्यक्षात कधी सुरुवात होते, याकडे लक्ष लागले आहे.

Leave a Comment